सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:18 PM2020-01-28T15:18:34+5:302020-01-28T15:21:06+5:30

कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही केला जाणार आहे.

All four crore balance budget presented! | सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

कणकवली नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पीय सभेत सोमवारी नगरसेवकांनी नवीन तरतुदी सुचविल्या.

Next
ठळक मुद्देसव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !कणकवली नगरपंचायतीचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही केला जाणार आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे , अन्य अधिकारी व कर्मचारी , नगरसेवक उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतीचा सन २०१९ - २० चा १० कोटी ६९ लाख १४ हजार ५७८रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ३० कोटी ५४ लाख ९३ हजार ५०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प होता. आता सन २०२०- २१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तो ६४ कोटी ८ लाख ८५ हजार ५९३ .३० रुपयांचा आहे.

तर ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये नगरपंचायतीकडे शिल्लक राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास या अर्थसंकल्पास पुरवणी अंदाजपत्रक जोडण्याचेही ठरविण्यात आले.

नगरपंचायतीला सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाकडून विशिष्ट प्रयोजनाकरिता अनुदाने, अंशदाने यांच्या माध्यमातून ५१ कोटी १३ लाख १० हजार रुपये मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर एकूण भांडवली जमा ५१ कोटी ४३ लाख ८८ हजार रुपये होतील.

महसुली खर्च १० कोटी ३८ लाख ५८ हजार ८८० रुपये होईल अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या अंतर्गत प्रशासकीय खर्च १ कोटी ४४ लाख ९७ हजार ६१८ रुपये व आस्थापना खर्च ३ कोटी १४ लाख ५३ हजार २६२ रुपये असेल. तसेच इतर खर्चही यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

गतवर्षी पेक्षा यावर्षीच्या अर्थ संकल्पात निश्चीतच वाढ झाली आहे. यामध्ये नागरिकांवर विशेष असा कर वाढविण्यात आलेला नाही . मात्र, घरपट्टीमध्ये वाढ अपेक्षित धरलेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत नगरपंचायतीचे उत्पन्नही काही प्रमाणात वाढणार आहे.

अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या एकूण रकमेत वाढ होणार आहे. त्यामध्ये १४ वा वित्त आयोग, नगरोत्थान जिल्हास्तर योजना, नगरोत्थान राज्यस्तरीय योजना अशा योजनांमधून तरतुदी सुचविल्या आहेत.

पोस्टाच्या जमिनीचे भूसंपादन करा !

आचरा बायपास रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडले आहे. पोस्टाकडूनही जागेबाबत सकारत्मक प्रतिसाद मिळत नाही . त्यामुळे या रस्त्यासाठी पोस्टाची आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यात यावे. असे नगरसेवक बंडू हर्णे यांनी यावेळी सुचविले. त्यास नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर नगरसेवकांनी संमती दर्शविली.

शहर विकासासाठी एकत्र या !

मुडेडोंगरी येथील क्रीडांगण तसेच शहरातील अन्य आरक्षणे विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची नगरपंचायतला आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध व्हावा म्हणून सर्व नगरसेवकांनी कोणतेही राजकारण मध्ये न आणता पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे. तसेच अधिकाऱ्यांनी शासनाकडे निधी मागताना दूरदृष्टी ठेवून मागणी करावी . असे आवाहन नगरसेवक अबीद नाईक यांनी यासभेत केले.

तर श्रेयाचे राजकारण न करता सर्वानी एकत्र येऊन निधी साठी प्रयत्न करूया असे कन्हैया पारकर व सुशांत नाईक यांनी सांगितले. त्यामुळे याविषयावरून सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी या विषयावर बोलताना मागील काही विषयांवरून एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. मात्र, ही सभा नेहमीप्रमाणे खडाजँगी न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


 

Web Title: All four crore balance budget presented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.