विमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:28 PM2019-12-09T12:28:15+5:302019-12-09T12:30:48+5:30

चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. एप्रिल महिन्यात हे विमानतळ सुरू झालेच पाहिजे, असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी विमानतळाच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

 Airport should start by April, Vinayak Raut orders authorities | विमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश

चिपी विमानतळ आढावा बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी संजय पडते, संदेश पारकर, राजेश लोणकर, अविनाश रेवंडकर, मंदार शिरसाट उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे विमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश चिपी विमानतळाच्या कामाबाबत आढावा बैठक

कुडाळ : चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. एप्रिल महिन्यात हे विमानतळ सुरू झालेच पाहिजे, असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी विमानतळाच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

चिपी विमानतळाच्या कामाची आढावा बैठक खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळ येथे पार पडली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, सुनील म्हापणकर, शिवसेनेचे नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, आयआरबीचे प्रमुख अधिकारी राजेश लोणकर, एमआयडीसीचे करावडे, अविनाश रेवंडकर, वीज वितरण, दूरसंचार तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सचिन देसाई, सुनील डुबळे, सचिन वालावलकर, विजय घोगळे, रुपेश मुंडये, सुयोग चेंदवणकर, महेश सामंत, मंजुषा आरोलकर, श्रद्धा कुडाळकर उपस्थित होते.

यावेळी राऊत यांनी दूरसंचारच्या अधिकाºयांना येथील कनेक्टिव्हिटीबाबत विचारणा केली असता अधिकाºयांनी लवकरच कनेक्टिव्हिटीचे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठ्याबाबत विचारले असता त्यांनीही आवश्यक वीजपुरवठा लवकरात लवकर देऊ असे सांगितले. तसेच परुळे ग्रामपंचायत ते विमानतळापर्यंत आवश्यक पथदीपांसाठी निधी देण्याची ग्वाही दिली.

यावर आता कोणतीही सबब चालणार नाही. येत्या आठ दिवसांत येथील दूरसंचार तसेच वीज वितरण विभागाकडून तत्काळ सेवा सुरू करावी, अशा सूचना राऊत यांनी दिल्या. कुडाळ भंगसाळ नदी येथे नवीन बंधारा बांधण्यासाठी साडेचार कोटी रुपये दिले.

या ठिकाणाहून दिवसाला साडेतीनशे घनमीटर पाणी कुडाळ एमआयडीसी येथून विमानतळाकडे आणण्यासाठी २३ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून, त्यासाठी बांधकाम विभागाने आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे आहे. याकडे विमानतळ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी खासदार राऊत यांनी या संदर्भात येत्या चार दिवसांत १८ किलोमीटरच्या पाईपलाईनसाठी आवश्यक तो आराखडा बनवून द्यावा, असे आदेश बांधकाम अधिकारी आवटी यांना दिले.

चिपी विमानतळासाठी आवश्यक तो परवाना अजूनही प्रशासनाकडून मिळाला नसल्याचेही आयआरबीच्या अधिकाºयांनी खासदार राऊत यांना सांगितले. यावेळी आवश्यक तो परवाना मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांशीही बैठक झाली आहे. लवकरच परवाना मिळणार असून, शासनाच्या उड्डाण योजनेत या विमानतळाचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

गोव्यासह रत्नागिरी, कोल्हापूरलाही फायदा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर तत्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ होण्यासंदर्भात आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. हे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

गोवा येथील प्रस्तावित मोपा विमानतळ अजून दहा वर्षे तरी सुरू होणार नसल्याने याचा फायदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्याबरोबरच गोव्यासह कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यांनाही चिपी विमानतळाचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Web Title:  Airport should start by April, Vinayak Raut orders authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.