रेडेघुमट झाडवेलींच्या विळख्यात

By Admin | Updated: October 23, 2014 22:54 IST2014-10-23T20:54:47+5:302014-10-23T22:54:52+5:30

बांदा येथील ऐतिहासिक वारसा : नष्ट होण्याच्या मार्गावर, पर्यटन महामंडळाने लक्ष देणे गरजेचे

In addition to the red tumors | रेडेघुमट झाडवेलींच्या विळख्यात

रेडेघुमट झाडवेलींच्या विळख्यात

नीलेश मोरजकर - बांदा शहराच्या गतवैभवाची साक्ष देणारी सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीतील ‘रेडेघुमट’ ही वास्तू शासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही वास्तू पुरातत्व खाते तसेच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे झाडवेलींच्या विळख्यात सापडली आहे. पर्यटन विकास महामंडळाने या वास्तुच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करुनही निधी नसल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे या वास्तूकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले असून ही वास्तू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
बांदा हे ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी इतिहासकालीन इमारतींचे अवशेष आजही पहावयास मिळतात. मात्र, याठिकाणी असलेली कित्येक ऐेतिहासिक स्थळे ही काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. बांदा शहराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू लोप पावण्याच्या मार्गावर असून यात ‘रेडेघुमट’ वास्तुचा देखील समावेश आहे.
मात्र, पर्यटन खात्याने तसेच प्रशासनाने या वास्तुच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पाच वर्षांपूर्वी येथील वक्रतुंड कला- क्रीडा युवक मंडळाने या वास्तुची पूर्णपणे साफसफाई करुन या वास्तुच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच या वास्तुच्या परिसरातील अतिक्रमणाबाबत शासनाचे लक्ष वेधले. मंडळाने या वास्तुला नवी झळाळी प्राप्त करुन दिल्यानंतर या वास्तुला देशींबरोबरच डेन्मार्क येथील विदेशी पर्यटकांनी देखील भेट देऊन या वास्तुबाबत कौतुकोद्गार काढले होते.
मात्र, वेळोवेळी आश्वासने देण्यात येऊन या वास्तुच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतीय पुरातत्व खात्याने या वास्तुची पाहणी केली होती. पर्यटन विकास महामंडळाने या वास्तुच्या विकासासाठी कोकण पॅकेजमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, अद्यापपर्यंत कामास सुरुवात करण्यात न आल्याने ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देखभाल दुरुस्तीअभावी या वास्तुवर पुन्हा झाडवेलींचा विळखा पडला आहे.
तसेच ही वास्तू जंगली श्वापदांचे आश्रयस्थान बनली आहे. यामुळे याठिकाणी पर्यटक भेट देण्यात येत नाहीत. या वास्तुचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास केल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. तसेच या वास्तुच्या माध्यमातून बांदा शहराचा इतिहास देखील जतन होणार आहे. या वास्तुचा विकास होणे ही काळाची गरज आहे. याचा फायदा भविष्यात बांदा शहराच्या पर्यटन विकासासाठी होणार आहे. याकडे शहरातील लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन विकास खात्याने लवकरात लवकर या वास्तुची दुरुस्ती करावी अन्यथा ही वास्तुही काळाच्या पडद्याआड जाईल, असा इशारा येथील इतिहासप्रेमींनी दिला आहे.

सोळाव्या शतकातील ऐतिहासिक वास्तू
बांदा शहराची शान असलेल्या रेडेघुमट वास्तुची उभारणी सोळाव्या शतकात आदिलशाही राजवटीत आदिलशाहाचा सुभेदार पिरखान याने केली होती. या वास्तुची उंची ही १२0 फूट आहे. या वास्तुला चबुतरे असून ही वास्तू भव्यदिव्य आहे. ही वास्तू म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. घुमटाच्या प्रवेशद्वारावरील दरवाजावर कोरीव काम करण्यात आले आहे. या वास्तुच्या बाजूला घोड्यांना बांधण्यासाठी चबुतरे तसेच बारमाही पाणी असलेली तळी बांधण्यात आली आहे. या बारमाही पाण्याच्या तळीचा वापर शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या तळीच्या स्त्रोताची स्वच्छता राखल्यास हे शक्य होणार आहे. शहरातील इतर ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. त्याठिकाणी केवळ त्या वास्तूंचे अवशेष शिल्लक आहेत. यातील ‘बैलघुमट’ ही वास्तू पूर्णपणे नष्ट झाली आहे. केवळ रेडेघुमट ही वास्तू अजूनही अस्तित्वात आहे.

Web Title: In addition to the red tumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.