अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वेंगुर्ल्याची भुरळ!, दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद
By सुधीर राणे | Updated: December 22, 2022 17:43 IST2022-12-22T17:42:38+5:302022-12-22T17:43:48+5:30
सोनाली सोबत बॉलिवूड अभिनेता कुणाल विजयकर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वेंगुर्ल्याची भुरळ!, दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद
वेंगुर्ला: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पर्यटन विषयक एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान वेंगुर्ला शहराला भेट दिली. दरम्यान, तिने वेंगुर्ला मार्केटमध्येही फेरफटका मारला. यावेळी सोनालीला वेंगुर्ल्याची भुरळ पडली. सोनाली सोबत बॉलिवूड अभिनेता कुणाल विजयकर देखील होता.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालक यांमार्फत १५ डिसेंबरपासून ३ महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात गंतव्यस्थानाच्या जाहिरातीसाठी, ६ माहितीपटांची मालिका शूटसाठी टीव्ही १८ ब्रॉडकास्ट लिमिटेडची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेमध्ये वेंगुर्ल्यामधील मत्स्य बाजारपेठ, वेंगुर्ला नगरपरिषद इमारत, कलादालन, वेंगुर्ला लाईट हाऊस यांचा समावेश आहे. ही मालिका म्हणजे वेंगुर्ला शहर पर्यटनासाठी नक्कीच हातभार असेल अशी माहिती यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे.
या माहितीपट मालिका शूट करण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषद स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन यास भेट दिली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कम्पोस्ट डेपो येथे तयार केलेले जैविक खत तसेच फुलाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेमार्फत राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली.
दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद
दरम्यान, उभादांडा-वरचेमाडवाडी येथे अमृतनाथ दशातवार नाट्य मंडळाचा ‘कुर्मदासाची वारी‘ हा नाट्यप्रयोग आयोजित केला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी या नाटकाच्या ठिकाणी भेट देत प्रेक्षकांमध्ये बसून या नाटकाचा आनंद लुटला. तर प्रेक्षकांचीही या दोन्ही अभिनेत्र्यांसमवेत फोटो काढण्यासाठी धावपळ उडाली.