रामेश्वराचा हुकूम जाहला अन् गावपळणीची तारीख ठरली; आचरा गाव होणार निर्मनुष्य  

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 2, 2024 19:12 IST2024-12-02T19:11:29+5:302024-12-02T19:12:40+5:30

वेशीबाहेर गजबजणार गावकऱ्यांचे संसार

Achara villagers are ready to celebrate Gaopalan as a ritual by staying outside the gate | रामेश्वराचा हुकूम जाहला अन् गावपळणीची तारीख ठरली; आचरा गाव होणार निर्मनुष्य  

रामेश्वराचा हुकूम जाहला अन् गावपळणीची तारीख ठरली; आचरा गाव होणार निर्मनुष्य  

आचरा : गेले काही दिवस सुरू असलेल्या बहुचर्चित आचरा गावच्या गावपळणीची उत्सुकता अखेर देव दीपावलीच्या मुहूर्तावर संपली. श्री देव रामेश्वरच्या हुकुमावरून १५ डिसेंबरला गावपळण होत आहे. तब्बल पाच वर्षांनी रामेश्वराने कौल दिल्याने गावातील ग्रामस्थ गावच्या वेशीबाहेर राहून गावपळण ही प्रथा जणू सोहळ्याप्रमाणे साजरा करण्यास सज्ज झाले आहेत.

संस्थानकालीन आचरेची गावपळण दर तीन ते पाच वर्षांनी होत असते. मागील गावपळण डिसेंबर २०१९ साली झाली होती. यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रामेश्वराला देव दीपावली दिवशी दुपारी कौल प्रसाद घेण्यात आला. श्री रामेश्वराच्या हुकुमावरून प्रथेप्रमाणे १५ डिसेंबरला आचरेची गावपळण होणार असल्याचे स्पष्ट झाले.

तीन दिवस चालणाऱ्या या गावपळणीत संपूर्ण आचरेवासीय आपल्या कुत्रे,मांजर, गुरे, ढोरे कोंबड्या, यांसह गाव वेशीबाहेर राहणार आहेत. सुमारे साडे सात हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव संपूर्ण निर्मनुष्य होणार आहे, अशी माहिती वहिवाटदार मिराशी, देवस्थान सचिव संतोष मिराशी यांनी दिली.

या गावपळणीला हिंदू बरोबर,मुस्लिम, ख्रिश्चन आनंदाने सहभागी होतात. ग्रामस्थ गावाच्या सीमेबाहेर कारीवणे नदी किनारी, चिंदर, त्रिंबक, पोयरे, मुणगे, आडबंदर, वायंगणी, सडेवाडी या भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून राहणार आहेत. यात सर्वधर्मीय सहभागी होत असल्याने आचरेची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. आजच्या विस्कळीत जीवनशैलीत गावपळणीनिमित्त तीन दिवस तीन रात्री संपूर्ण आचरे गाव वेशी बाहेर एकत्र नांदणार आहे.

आजच्या विज्ञान युगातही ही प्रथा ग्रामस्थ मोठ्या हौशीने शेकडो वर्षे पाळत आली आहेत. तीन दिवस कोणतेही काम नसल्याने संपूर्ण दिवस आनंदात हसत खेळत संगीत, भजने यात आचरे गावची रयत तीन दिवस तीन रात्री रममाण झाल्याचे दृश्य दिसणार आहे. गावच्या वेशीबाहेर गजबजले गाव जणू वेगळ्याच दुनियेत हरवून जाते. या सोहळ्यातील अविस्मरणीय क्षण जोपासताना या प्रथेचा वसा वर्षानुवर्षे पुढे नेण्याचा प्रत्येक गावकरी प्रयत्न करतो. कामानिमित्त बाहेर गावी असलेले ग्रामस्थ खास गावपळण सोहळ्यासाठी आचरे गावी येतात.

Web Title: Achara villagers are ready to celebrate Gaopalan as a ritual by staying outside the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.