बेदरकारपणे वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ
By Admin | Updated: January 29, 2015 23:40 IST2015-01-29T21:47:11+5:302015-01-29T23:40:49+5:30
धूमस्टाईलचे वेड : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडीची चावी...

बेदरकारपणे वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ
चिपळूण : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येपासून बेदरकारपणे धूमस्टाईलने वाहने चालवून मोठ्या प्रमाणावर अपघात झाल आहेत. या अपघातात अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. दुचाकी चालविण्याच्या वाढत्या क्रेझमुळे अपघातांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये सध्या धूमस्टाईल दुचाकी चालविण्याची क्रेझ आली आहे. १८ वर्षांच्याखालील अनेक तरुण तिघे तिघे मिळून, वेगाने रस्त्यावरुन गाडी पळवताना दिसतात. यामुळे, अनेक लहान मोठे अपघात होतात. या अपघातात मोडतोड होते. रस्त्यावरुन घसरुन गाडीचे व स्वत:चे नुकसान होते. गेल्या तीन दिवसात २० पेक्षा जास्त अपघात झाले. शिरगांव, सावर्डे व चिपळूण पोलीस ठाण्यात कमी अधिक प्रमाणात त्याची नोंद झाली आहे.
चिपळूण-कऱ्हाड मार्गावर दुचाकी अपघातात रविवारी रात्री श्रीकांत शिंगाडे मृत्युमुखी पडला. त्याचा भाऊ बाबासाहेब शिंगाडे गंभीर जखमी झाला. प्रजासत्ताक दिनी सकाळी आठ वाजण्यापूर्वी खेर्डी एमआयडीसी संभाजीनगरचे दोन तरुण चिपळूण येथे आले. आपल्या मित्राला बरोबर घेऊन ते सती येथे कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना, त्यांची दुचाकी एका मारूती ओमनी गाडीवर आदळली. एकजण पुढे उडाला, एकजण मागे उडाला व मधे बसलेल्या रुद्राक्ष जंगम याच्या पायाला जबरदस्त मार लागला. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. आकाश वडगावकर व अमित शिंदे हेही जखमी झाले होते. या अपघातात ओमनीचे मोेठे नुकसान झाले. याखेरीज उदय नलावडे, शिवाजी कदम, योगेश खोपटकर व शैलेश चव्हाण, संतोष आवळकर, अशोक जाधव, वैभव शिंदे, राकेश राडे, दिनेश पवार, विजय पाष्टे, महेश विचारे, धमेंद्र राय, प्रवीण कुरुप असे अनेकजण अपघातात जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
लहान वयात पालक मुलांना दुचाकी देतात. त्यांच्याकडे गाडी चालवायचा परवानाही नसतो, गाडी चालवण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान त्यांना नसते. शिवाय, त्यांना परिणामाची भीती नसते. त्यामुळे, बेदरकारपणे वाहन चालवून ते स्वत:सह रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीवाशी खेळतात व वाहनांची मोडतोड करीत असतात. पालकांनीच आपला पाल्य सज्ञान होईपर्यंत तरी, त्याच्या हाती दुचाकी देऊ नये. अन्यथा हे असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत.
- शांताराम साप्ते,
वाहतूक हवालदार, चिपळूण