Absent branch engineer; Vabhave-Vaibhavwadi Municipal Panchayat Sabha canceled | शाखा अभियंता गैरहजर; वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा रद्द 
शाखा अभियंता गैरहजर; वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा रद्द 

ठळक मुद्देशाखा अभियंता गैरहजर; वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा रद्द पदाधिकारी आक्रमक; मंगळवारी होणार सभा

वैभववाडी : सतत सूचना करूनही शाखा अभियंता उपस्थित नसल्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची आक्रमक सभाच रद्द केली. ही सभा आता मंगळवारी होणार असून त्यावेळी तरी शाखा अभियंता उपस्थित राहणार का? हे पहावे लागणार आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रभारी नगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, मुख्याधिकारी कौस्तुभ गवाणे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

इतिवृत्त वाचनातील पहिलाच मुद्दा शाखा अभियंत्याशी निगडीत होता. हा विषय आल्यानंतर तांत्रिक बाब असल्यामुळे इतर कुणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार होईना. त्यामुळे बांधकाम सभापती संतोष पवार यांनी ह्यवारंवार शाखा अभियंत्याचा विषय सभेत येत आहे. शाखा अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे नगरपंचायतीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे यापूर्वी अनेकवेळा त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

या सभेला त्यांनी उपस्थित रहावे, असे त्यांना कळविण्यात आले होते. तरीदेखील ते उपस्थित राहिलेले नाही. ही बाब गंभीर आहे. जर प्रश्नांची उत्तरे देणारे अधिकारी गैरहजर असतील तर सभा घ्यायची कशाला? अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

पवार यांच्या भूमिकेला सर्व उपस्थितांनी सहमती दर्शविली. त्यानंतर कोणत्याही विषयाची चर्चा न करता सभा रद्द करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी शाखा अभियंत्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर रद्द केलेली ही सभा मंगळवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु अनेकदा कारवाईची भीती दाखवूनसुद्धा न जुमानणारे शाखा अभियंता या सभेला तरी हजर राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Absent branch engineer; Vabhave-Vaibhavwadi Municipal Panchayat Sabha canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.