कुडाळ येथे उद्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा, चित्रकार किरण हणमशेठ करणार मार्गदर्शन
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2023 14:20 IST2023-03-11T14:20:04+5:302023-03-11T14:20:21+5:30
कुडाळ : एमआयडीसीमधील श्री गणेश स्वामी कलादालनात रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या ...

कुडाळ येथे उद्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा, चित्रकार किरण हणमशेठ करणार मार्गदर्शन
कुडाळ : एमआयडीसीमधील श्री गणेश स्वामी कलादालनात रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या कालावधीत बेळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार किरण हणमशेठ यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिचित्र (पोट्रेट) प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
चित्रकला क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना चित्रकला क्षेत्रातील व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, वस्तूचित्र, कंपोजीशन तसेच कला क्षेत्रातील विविध विषयांची माहिती प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाद्वारे व्हावी याकरिता श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळच्यावतीने ही कार्यशाळा होणार आहे.
यावेळी केबीके चित्रमंदिर ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कलामहर्षी के. बी. कुलकर्णी यांचे नातू शिरीष कुलकर्णी, चित्रकार अनिल कुबल (मुंबई), सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, पी. के. सावंत पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, चित्रकार अनिल आचरेकर (मुंबई) तसेच इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
विविध पुरस्कारांचे मानकरी
यावेळी व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक दाखवणारे किरण हणमशेठ हे चित्रकार के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य असून ते कोल्हापूर शिणोली येथील जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्या चित्रांची मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट मुंबई येथे तीन तर नेहरू आर्ट सेंटर मुंबई व पुणे येथे प्रदर्शने झाली आहेत. त्यांना आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड २००१ चा तसेच रवी परांजपे युवा कलाकार पुरस्कार २०१० व कलामहर्षी के. बी. कुलकर्णी कलागौरव पुरस्कार २०२२ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, पालक व कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन चित्रकार रजनीकांत कदम यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.