सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांचा कळप शिरला, नागरिकांत भीतीचे वातावरण
By अनंत खं.जाधव | Updated: May 28, 2024 16:50 IST2024-05-28T16:49:49+5:302024-05-28T16:50:19+5:30
वनविभागाने बंदोबस्त करावा

सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांचा कळप शिरला, नागरिकांत भीतीचे वातावरण
सावंतवाडी : एकीकडे शहरात उपद्रव निर्माण करणार्या माकड व वानरांना रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची प्रगणनना सुरू आहे. तर दुसरीकडे गव्याचे कळप थेट लोकवस्तीत शिरू लागले आहेत. असाच प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनुभवण्यास मिळाला. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी तब्बल १४ गव्यांचा कळप भरवस्तीत शिरला. त्यामुळेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या गव्यांना आता रोखणार कोण असा प्रश्न पडू लागला आहे.
येथील नरेंद्र डोंगरावर खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी स्थिरावलेले गवे कळपाने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माठेवाडा होळीचा खुंट तसेच सालईवाडा परिसरात येऊ लागले आहेत. तर बाजूला असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर ते हजेरी लावतात. यापूर्वी अनेक वेळा अपघातही झाले आहेत, तर काही दिवसापूर्वी यातील एका गव्याने थेट वनविभागाच्या कार्यालयाकडे हजेरी लावली होती. यात कोणालाही दुखापत झाली नसती तरी, भरवस्तीत फिरणाऱ्या गव्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान सोमवारी मध्यरात्री उशिरा माठेवाडा भागात तब्बल १४ गव्यांच्या कळपाने भरवस्तीत घरासमोरील रस्त्यावर हजेरी लावली. बराच वेळ गवे त्याच ठिकाणी होते गेले अनेक दिवस गव्यांचा कळप त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.