कोकणात ८० टक्के आंबा लागवडीखालील क्षेत्र - प्रकाश शिनगारे
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 22, 2024 18:32 IST2024-05-22T18:31:28+5:302024-05-22T18:32:21+5:30
रोटरी क्लब मँगो सिटीतर्फे देवगडात आंबा चर्चासत्र

कोकणात ८० टक्के आंबा लागवडीखालील क्षेत्र - प्रकाश शिनगारे
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवडीखाली असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील काही वर्षात आंबा उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे बदलते हवामान आहे. मोठ्या प्रमाणात वाढते तापमान, बदललेला पाऊस पडण्याचा हंगाम आणि वर्षभर पडणारा पाऊस थंडीच्या प्रमाणात होणारे चढ-उतार यामुळे आंबा हंगाम लांबणीवर जात आहे.
त्यातच आंबा पिकावर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून खूपच वाढला आहे. फळमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात माशीला आकर्षित करण्यासाठी जे औषध आहे ते बागायतदारांनी दर्जेदार घेतले पाहिजे. सर्व बागायतदारांनी दर्जेदार औषध सापळ्यात ठेवले तर फळमाशीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आंबा बागायतदारांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेंद्र पतंगे (सहयोगी अधिष्ठाता काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा), डॉ. केतन चौधरी (विस्तार शिक्षण विभाग प्रमुख), डॉ. सुरेश नाईक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे, सचिव विजय डांबरी, विजय बांदिवडेकर, नरेश डामरी, तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे आदी उपस्थित होते.
डॉ. एस. बी. स्वामी यांनी ‘आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केतन चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी घारे यांनी केले.
एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे
डॉ. शिनगारे म्हणाले की, थ्रीप्सवर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे थ्रीपचे जीवनशैलीत बदल झाला आहे. प्रतिकारशक्ती वाढली आहे, त्यामुळे थ्रीप्समध्ये वाढ होताना दिसत आहे. विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. आंबा उत्पादन जास्तीत जास्त होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, यातूनच आंबा उत्पादन चांगले होईल.