जलसंधारणासाठी ७ कोटी खच
By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-19T23:09:49+5:302014-09-20T00:35:59+5:30
पाणलोट कार्यक्रम : अयोग्य नियोजनामुळे सभांमध्ये वादंर्ग

जलसंधारणासाठी ७ कोटी खच
सिंधुदुर्गनगरी : गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामावर गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, या कामातील अयोग्य नियोजन आणि दर्जाहीन कामामुळे जिल्हा परिषदेच्या सभा गाजू लागल्या आहेत.
शासनाच्या गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत राज्य कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कामांचे नियोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी प्राप्त झाला. या निधीतून जिल्ह्याभरात विविध कामे हाती घेण्यात आली व त्यावर प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्चही करण्यात आला.
मात्र, राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कामांची निवड करताना योग्य जागेची निवड न झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने आपल्या सोयीच्या ठिकाणी कामे करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सभांमध्ये सदस्यांनी केला. तर गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांचा तपशील घ्यावा, अशी मागणीही केली होती. त्यानुसार राज्य कृषी अधीक्षक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी खर्च झाल्याचे उघड झाले आहे. मात्र या निधीतून झालेली कामे योग्य ठिकाणी झाली नसल्याचाही आरोप सदस्यांकडून होत आहे. तर या कामातील दर्जा पाहता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००९-१० पासून गेल्या पाच वर्षात माती नाला बंधारे, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, डोंगर उतार आडवे बांध, लूज बोल्डर ट्रक्चर, अर्दन ट्रक्चर आदी लाखो रूपयांची कामे करण्यात आली आहेत.
मात्र, कामांमुळे येथील जनतेला त्याचा किती लाभ झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची आजची स्थिती काय? किती बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जाते? किती शेती ओलिताखाली आली आहे? हा मोठा गौण प्रश्न आहे.
राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून या कामांचे नियोजन केले जाते. मात्र या योजना व कामांची माहिती स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना दिली जात नाही. कामाची ठिकाणे ठरविताना विश्वासात घेतले जात नाही. आपल्या सोयीच्या ठिकाणी बंधारे उभारून नाहक अनाठायी शासनाचा निधी खर्च होत असल्याबाबत संशय सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षातील तब्बल ७ कोटींच्या कामाभोवती संशयाचे वारे वाहू लागले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणलोटची कामे जिल्ह्यात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवतच आहे. अद्यापही जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. शेती, बागायतींसाठी पाण्याची वानवाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा आणि खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रूपये निधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत
आहे. (प्रतिनिधी)
गेल्या पाच वर्षातील खर्चाची आकडेवारी
सन २००९- १० मध्ये माती नाला बांध- ३७ लाख ५५ हजार, सिमेंट नाला बांध- ४८ लाख ६६ हजार, वळण बंधारे- ९ लाख ९९ हजार, शेततळे- २ लाख ९९ हजार असा एकूण ९९ लाख १९ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.
सन २०१०- ११ मध्ये माती नाला बांध- ९१ लाख ४१ हजार, डोंगर उतार आडवे बांध- १ लाख ४५ हजार असा एकूण १ कोटी निधी खर्च झाला आहे.
सन २०११- १२ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख २५ हजार, अर्दन ट्रक्चर- ५ लाख २४ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी १२ लाख २५ हजार असा मिळून १ कोटी २१ लाख ७४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.
सन २०१२-१३ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख १२ हजार, अर्दन ट्रक्चर- १० लाख ५५ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी ४ लाख ८३ हजार असा मिळून १ कोटी १९ लाख ५० हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.
सन २०१३-१४ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ९ लाख २८ हजार, अर्दन ट्रक्चर- ३४ लाख, माती नाला बंधारे- १ कोटी ३४ लाख ३८ हजार, सिमेंट नाला बंधारे- ८४ लाख ९३ हजार, वळण बंधारे- २ लाख ४ हजार असा मिळून २ कोटी ३३ लाख ८१ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.