६,७00 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
By Admin | Updated: November 7, 2014 23:43 IST2014-11-07T21:53:13+5:302014-11-07T23:43:38+5:30
जिल्हा परिषद प्रशासन : लोकसहभागातून पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न

६,७00 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजनेसाठी प्रयत्न सुरू केले असून जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे असे एकूण ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे सर्व बंधारे लोकसहभागातून घातले जाणार आहेत.
जिल्ह्यात मे अखेर काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही वणवण काही प्रमाणात कमी होण्यासाठी जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत कच्चे व पक्के बंधारे बांधण्यासाठीची नवीन योजना २०१२ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन यांनी अस्तित्वात आणली. त्यानंतर ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. एम.आर.ई.जी.एस.मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेला लोकसहभागातून राबवा, असे आदेश शासनाने काढले. ही योजना राबविल्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली होती. लोकसहभागातून बंधारे बांधण्यासाठी शक्य तेवढा प्रतिसाद लाभत नसल्याने हे उद्दिष्ट ७५ ते ८० टक्के पूर्ण होत असे.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा शेकडो मिलीमिटरची घट झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई भासण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यावर्षीही पुढाकार घेतला असून जिल्ह्यात ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे बंधारे कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे असणार असून लोकसहभागातून हे बंधारे घालावयाचे आहेत. बंधारे लवकरात लवकर घालून पूर्ण करावेत, असे सक्त आदेशही जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली असून दोडामार्गात अद्यापपर्यंत १४ बंधारे बांधून पूर्ण झालेले आहेत.
पूर्वी कच्चे व वनराई बंधारे हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बांधले जात होते. यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, हे बंधारे या योजनेतून घालणे बंद केल्याने या योजनेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी लोकसहभागातून बंधारे घालण्यास थोडासा हातभार लावला होता. या लोकप्रतिनिधींनी बंधारे घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत पाणी वापर संस्था स्थापण्याचे आवाहन केले आहे.
बंधारे बांधण्यास सुरूवात होणे आवश्यक
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये घट होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या कडक ऊन पडत असल्याने पाणी आटत आहे.
आतापासूनच प्रशासनाने याबाबत जनजागृती करून शक्य असेल तेवढ्या ठिकाणी बंधारे बांधण्यास सुरूवात करावी.
जेणेकरून सध्या असलेली पाण्याची पातळी काही महिने टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
तालुकावार दिलेले उद्दिष्ट (कच्चे व पक्के बंधारे)
तालुका उद्दिष्ट
कणकवली ८५०
दोडामार्ग३००
वेंगुर्ला४००
मालवण८००
देवगड७००
सावंतवाडी८५०
वैभववाडी३००
कुडाळ८००
सामाजिक वनीकरण २००
जिल्हा अधिकारी१५००
कृषी कार्यालय
एकूण६७००