मालवणमध्ये ६३ टक्के मतदान
By Admin | Updated: June 30, 2014 00:08 IST2014-06-29T23:58:31+5:302014-06-30T00:08:34+5:30
पोटनिवडणुक : आज निकाल; किरकोळ बाचाबाची

मालवणमध्ये ६३ टक्के मतदान
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ३ ‘क’च्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागातील ३३०६ मतदारांपैकी २१०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभागातील चार मतदान केंद्रांवर दिवसभरात सरासरी ६३.७९ टक्के मतदानाची नोंद झाली. किरकोळ बाचाबाचीची घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. शहर विकास आघाडी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी आहे.
मालवण नगरपालिकेतील प्रभाग क्र. ३ मधील काँग्रेसच्या उमेदवार अपर्णा गावकर यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. एका जागेसाठी शहरविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत आहे. प्रभाग क्र. ३ ‘क’ मधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. मतदानासाठी पंचायत समिती सभागृह, भंडारी हायस्कूल, सार्वजनिक शाळा गवंडीवाडा येथील चार मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. चारही केंद्रांवर साडेतीन वाजेपर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभागातील पंचायत समितीच्या मतदान केंद्रावर ६६.८४ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात पंचायत समितीच्या मतदान केंद्राजवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने कार्यकर्ते व पोलिसांत शाब्दिक बाचाबाचीची घटना घडली. (प्रतिनिधी)