४३ विद्यार्थ्यांना हृदयविकार
By Admin | Updated: August 13, 2014 23:39 IST2014-08-13T21:32:09+5:302014-08-13T23:39:52+5:30
स्थायी समिती सभेत माहिती : आरोग्य विभागाकडून योग्य कार्यवाही सुरू

४३ विद्यार्थ्यांना हृदयविकार
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या आरोग्य तपासणी दरम्यान जिल्ह्यातील ७९ शालेय विद्यार्थी हे दुर्धर आजाराने पीडित असून त्यापैकी तब्बल ४३ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीची पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेघर असणाऱ्या घरांची यादी तत्काळ तयार करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी स्थायी समिती सभेत दिले.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा सभाध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य सतीश सावंत, गुरूप्रसाद पेडणेकर, वंदना किनळेकर, मधुसूदन बांदिवडेकर, रेवती राणे, पुष्पा नेरूरकर, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला माजी राज्यमंत्री कै. बापूसाहेब प्रभूगावकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष कै. एकनाथ ठाकूर आणि माळीण गावातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्या वंदना किनळेकर यांनी हा शोक प्रस्ताव मांडला.
आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७९ विद्यार्थी हे दुर्धर आजाराने पीडित असून त्यातील ४३ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा आजार जडला आहे. उर्वरित विद्यार्थी हे औषधोपचाराने बरे होणारे असून त्यातील ४३ हृदयविकाराने बाधीत विद्यार्थ्यांची कोल्हापूर व मुंबई येथील रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. व्ही. सोडल यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही बेघर कुटुंबे आहेत. अशा कुटुंबांचा सर्व्हे करा व बेघर कुटुंबांची यादी तयार करा व ती इंदिरा आवास योजनेच्या लाभासाठी परत पाठविण्यात यावी, अशी सूचना सदस्य सतीश सावंत यांनी मांडली व तसा निर्णयही घेण्यात आला. (प्रतिनिधी)
१३व्या वित्त आयोगाचा पहिला टप्पा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून त्या बदल्यात ६ कोटी ९७ लाख रूपये वित्त विभागाकडे जमा झाले आहेत. हा निधी शासन निकषानुसार वाटप करण्यात येणार असून विविध योजनेमध्ये खर्च होणार आहे. जिल्हा परिषद विभागाला ६९ लाख खर्च होणार आहे. पंचायत समिती स्तरावर १ कोटी ३९ लाख तर ग्रामपंचायत स्तरावर ४ कोटी ८८ लाख असा निधी वितरीत केला जाणार आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला किंवा त्याबाबत काही समस्या असल्या तर विद्युत कंपनीशी संपर्क साधला तर ही कंपनी टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवा, अशी उत्तरे देते. याबाबत संदेश सावंत व सतीश सावंत यांनी प्रश्न उपस्थित करीत वीज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत ग्राहकांना तक्रार द्यायची असेल तर पूर्वीप्रमाणेच कार्यालयातच तक्रार नोंदवून घ्या, अशी सूचना केली.