सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

By Admin | Updated: November 7, 2014 23:30 IST2014-11-07T22:08:43+5:302014-11-07T23:30:05+5:30

अतिउत्साहामुळे खोल पाण्यात गेल्याने आनंदावर पडते विरजण

26 tourists drowned in six years | सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

दापोली : तालुक्यात विविध समुद्र किनाऱ्यावर सहा वर्षात २६ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने या भागातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मुरुड, केळशी, हर्णै, आंजर्ले, लाडघर, कोळथर, बुरोंडी, उटंबर, आडे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दापोलीला भेट देत असतात. पर्यटकांच्या दापोली भेटीत एकीकडे वाढ होत असतानाच अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण पडण्याचे प्रकार गेल्या सहा वर्षात प्रकर्षाने घडले आहेत. मात्र, तरीही पर्यटकांच्या जलसमाधीचे अनेक प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना अथांग समुद्र किनारा पाहून मनमुराद पोहण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, त्यांना या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव नसल्याने पर्यटनासाठी आलेले पर्यटक सागरीकिनाऱ्याची भुरळ पडून स्नानासाठी समुद्रात उतरतात व कोणतीही कल्पना येण्याआधीच बुडतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने या किनाऱ्यावर धोकादायक ठिकाणांचा फलक लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
लाईफ जॅकेट, समुद्ररक्षक व अन्य सुविधा या ठिकाणी द्याव्यात, अशी मागणी पर्यटक करीत आहेत. ओहोटीमुळे काही अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले किनारे अधिक सुरक्षित करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: 26 tourists drowned in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.