देवखेरकी गावाने गाठले मनरेगाचे २५ टक्के उद्दिष्ट
By Admin | Updated: July 28, 2015 00:30 IST2015-07-27T22:07:07+5:302015-07-28T00:30:16+5:30
सरपंच, ग्रामसेवकांचा एकत्रित परिणाम : चिपळूण तालुक्याला ११ हजार ८५० दिवसांचे होते उद्दिष्ट

देवखेरकी गावाने गाठले मनरेगाचे २५ टक्के उद्दिष्ट
सुभाष कदम - चिपळूण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्याला ११ हजार ८५० दिवसांचे कामाचे उद्दिष्ट होते. त्यातील १५ हजार २३५ दिवसांचे काम पूर्ण झाले असून, एकट्या देवखेरकी गावात २ हजार ७१६ दिवस मजुरांना काम मिळाले. चिपळूण तालुक्यात देवखेरकी प्रथम स्थानावर आहे. देवखेरकीचे सरपंच रमेश हळदे व ग्रामसेवक अभिजीत ढेंबरे यांनी योजना प्रभावीपणे राबवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करताना अनेक अडचणी येतात. आॅनलाईन यंत्रणा असल्याने वेळेवर मजुरांना मजुरी मिळत नाही. तुटपुंजी मजुरी असल्याने मजूर मिळणे अवघड होते, अशा अनेक तक्रारी या योजनेबाबत केल्या जातात. परंतु, देवखेरकी गाव याला अपवाद आहे. देवखेरकी गावाला तालुक्याचे ३० दिवसांचे उद्दिष्ट होते. पण या गावाने २ हजार ७१६ दिवस प्रत्यक्षात काम करुन तालुक्याचे २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.
देवखेरकीत ग्रामस्थांच्या सहभागाने हुंबरवाडी ते अमृतेश्वर मंदिर व्हाया देऊळवाडी रस्ता तयार करणे हे परिपूर्ण नवीन काम पूर्ण करण्यात आले. तळ्याचीवाडी अमृतेश्वर मंदिर खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ही दोन कामे मार्गी लागावीत, यासाठी देवखेरकी ग्रामस्थ, तत्कालीन गटविकास अधिकारी गणेश पिंपळे यांना भेटले होते. यावेळी हे काम मंजूर करण्यासाठी पिंपळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी चांगले सहकार्य केले.
ग्रामस्थांनीही त्यांना चांगली साथ दिली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत ग्रामस्थांनी चिकाटीने ही दोन्ही कामे पूर्ण केली आहेत.
ग्रामस्थांनी ही कामे केल्यामुळे त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळाला, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला व आपलेच काम समजून त्यांनी काम केल्याने कामही दर्जेदार झाले. या कामाची पाहणी राज्य गुणवत्ता निरीक्षक एन. एच. घोडेस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कामाचे त्यांनी कौतुक केले. सरपंच हळदे, ग्रामसेवक ढेंबरे व ग्रामस्थांना त्यांनी धन्यवाद दिले. हे काम पूर्ण होण्यासाठी तालुकास्तरावर सहाय्यक अभियंता अविनाश जाधव, कनिष्ठ सहाय्यक नोमेश कारेकर, तांत्रिक अधिकारी आरती बागकर, डाटा आॅपरेटर रंजना मोरे व ग्रामरोजगार सेवक सुधीर हळदे यांचे ग्रामपंचायतीला चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे मजुरांना वेळेवर मजुरी मिळाली व कामही वेगात झाले.
देवखेरकी तळ्याचीवाडी परिसरातील लोकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी चांगला मार्ग नव्हता. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिंचोळ्या पायवाटेने जावे लागत असे. आजारी असलेल्या रुग्णाला डोलीतून मुख्य रस्त्यावर आणावे लागे. ही गैरसोय या नवीन रस्त्यामुळे दूर झाली आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
देवखेरकीवासीयांचे आराध्य दैवत देव अमृतेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. हे पुरातन जागृत देवस्थान असल्याने अनेक पर्यटकही येथे येत असतात. अमृतेश्वरची यात्राही मोठी असते. त्यामुळे हा नवीन रस्ता सर्व सोयीचा झाला आहे. या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मिटल्याने गावात समाधान आहे. चिपळूण तालुक्यात मनरेगाअंतर्गत निवडलेल्या ९ ‘मॉडेल व्हिलेज’मध्ये देवखेरकी गावचा समावेश नसतानाही या गावाने चांगले काम करुन नवा आदर्श निर्माण केला आहे.