वर्षभरात वाचले २०० जीव
By Admin | Updated: July 28, 2015 00:28 IST2015-07-27T22:09:48+5:302015-07-28T00:28:28+5:30
श्रीक्षेत्र गणपतीपुळे : बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या तरूणाईची कामगिरी

वर्षभरात वाचले २०० जीव
संजय रामाणी - गणपतीपुळे -गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात जीवावर उदार होऊन समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचे काम येथील तरुण करीत आहेत. यामुळे वर्षभरात २००पेक्षा अधिक पर्यटकांचे प्राण वाचले आहेत.
गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील पर्यटकांचा समावेश आहे. स्वयंभू गणेशाचे दर्शन झाल्यानंतर समुद्र पर्यटनासाठी हे पर्यटक पाण्यात उतरतात. मात्र, त्यांना तेथील भौगोलिक स्थितीचा अभ्यास नाही. चौपाटीवर असणाऱ्या स्टॉलधारक व सुरक्षारक्षकांनी सूचना दिली तरी त्याचे पालन केले जात नसल्याने ते प्राणास मुकतात.
२००७ ते २०११ या सालात ३५ जणांना बुडून आपले प्राण गमवावे लागले. २००७पूर्वी अशीच स्थिती होती. २०१२मध्ये आठजणांना प्राण गमवावे लागले. २०१३ पासून आजपर्यंत पर्यटक बुडाल्याची माहिती नाही. याचे श्रेय सूरज पवार, मंगेश पवार, दिनेश ठावरे, विश्वास आंब्रे, शरद मयेकर, सचिन धामणस्कर, अजित केदार, संजय माने, हेमंत रहाटे, संदीप माने, अमेय केदार, मिथुन माने, बलराम घाणेकर, दत्तात्रय माईण, समीर केदार यांच्या टीमला या साऱ्याचे श्रेय द्यावे लागेल.
समुद्राच्या भरती - ओहोटीची कल्पना पर्यटकांना नसते. उधाण, पडणारे चाळ याची योग्य माहिती ग्रामपंचायत व देवस्थान सुरक्षा रक्षकांकडून व स्टॉल धारकांकडून घेतल्यास पर्यटक बुडणार नाहीत, असा विश्वास सूरज पवार यांनी व्यक्त केला. भविष्यात येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता वाटावी, त्यांना किनाऱ्यावरील सुरक्षा यंत्रणेकडून माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. रिसॉर्टला लागून दीड ते दोन किलोमीटर परिसरात समुद्र किनारा आहे. मात्र, महामंडळामार्फ त एकही सुरक्षारक्षक ठेवण्यात आलेला नाही. प्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, कार्यवाही झालेली नाही.
श्री देव गणपतीपुळे संस्थानतर्फे दोन सुरक्षारक्षक ठेवण्यात आले असून, पाहणी करण्यासाठी मनोरा उभारण्यात आला आहे. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी देवस्थान कर्मचारी तत्पर असतात. रुग्णवाहिकाही नेहमी तयार असते. योग्यवेळी औषधोपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत.
गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा उभी करावी, ही ग्रामस्थ व पर्यटकांची मागणी दुर्लक्षित आहे. येथील ग्रामपंचायतीमार्फत दोन सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. पावसाळी हंगामात दोन्ही सुरक्षारक्षक सुटी देण्यात येते. आॅगस्टनंतर ते पुन्हा नियमित होतील, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.