झेडपीचा एल्गार, हर हर गंगे!
By Admin | Updated: January 14, 2015 00:31 IST2015-01-13T23:21:36+5:302015-01-14T00:31:57+5:30
शुध्दीकरण मोहीम : जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी योजनांसाठी पालिकांची बांधली मोट

झेडपीचा एल्गार, हर हर गंगे!
जगदीश कोष्टी - सातारा -‘हर हर गंगे’ म्हणत देशातील सर्वात मोठी नदी शुध्द करण्याचा नारा उत्तर भारतात लावला जात असतानाच सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या शुध्दीकरणासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी सर्व पालिकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
केंद्र सरकारने ‘गंगा शुद्धीकरण प्रकल्प’ हाती घेतला आहे. यासाठी देशभरातील नद्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. केंद्र सरकारचा निधी जिल्ह्यात आणण्यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी कऱ्हाड पालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे, तर वाईमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे. नागरी वस्तीतील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी ओढे, नाले किंवा नदीत सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण होत आहे. सातारा, देगाव, शिरवळ, खंडाळा, उंब्रज, कऱ्हाड या मोठ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील अशुद्ध पाणी मोठ्या प्रमाणावर जवळच्या नदीत सोडले जाते. त्यातील पाणीही जलचरांसाठी हानिकारक ठरत आहे. याचा विचार करुन सातारा जिल्हा परिषदेने केंद्र सरकारकडून निधी आणून जिल्ह्यातील नद्या शुद्ध करण्याचा निर्धार केला आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, कऱ्हाड येथील जलव्यवस्थापन कार्यालयातील अधिकारी यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक जानेवारी महिनाअखेरपर्यंत घेतली जाणार आहे. त्यामुळे कृष्णामाई स्वच्छ व सुंदर दिसणार आहे.
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. मात्र, त्याठिकाणी प्रस्ताव पाठवून आणतील तेच यशस्वी होणार आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील पालिका हद्दीत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी सातारा जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे.
- रवी साळुंखे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा