‘बिनविरोध’ला तरुणाईचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:07+5:302021-01-03T04:37:07+5:30
मलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झालेले दिसत आहेत. ...

‘बिनविरोध’ला तरुणाईचा विरोध
मलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झालेले दिसत आहेत. फलटण पश्चिम भागातील मुख्यतः निंभोरे, वडजल, भिलकटी, काशीदवाडी, फरांदवाडी, नांदल, ढवळेवाडी, रावडी खुर्द, घाडगेमळा, होळ, मुरूम या प्रमुख अकरा ग्रामपंचायतींचा कारभार कोण पाहणार, यासाठी प्रमुख राजकीय पक्षात चुरस पाहायला मिळणार आहे.
निवडणुकीची धामधूम चालू असतानाच काही ग्रामपंचायती मात्र बिनविरोधचा प्रयत्न करू पाहत आहेत. यासाठी विरोधकांना सामावून घेत गावगाडा हाकण्याचा नवा प्रयोग काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून होताना पाहायला मिळतो. तरीही बिनविरोध निवडणुका या लोकशाहीस मारक असून, यामुळे क्षमता असणाऱ्या अनेक इच्छुकांना गावाच्या दबावाखाली माघार घ्यावी लागते. त्यामुळे शिकलेले तरुण या प्रक्रियेपासून दूर राहताना दिसतो.
नांदल, वडजल, होळ, मुरूम, भिलकटी परिसरातून बिनविरोध निवडणुकांना तरुण शिक्षित कार्यकर्ते विरोध करताना दिसत आहेत. फलटणच्या बहुतांश ग्रामपंचायतींवर राजे गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. अनेक गावांतून राष्ट्रवादीच्या दोन गटांत अटीतटीची लढत पाहायला मिळते. यातूनच बिनविरोधचा फॉर्म्युला समोर येत असतानाच ‘मनसे’सारखा पक्ष सक्रिय होताना दिसतो. गावागावात इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप ताकद दाखवणार आहेच. त्यामुळे बिनविरोधचा विरोध गावागावातून तरुण करत आहेत. त्यासाठी भाजपकडून त्यांना समर्थन मिळताना दिसते.
चौकट..
तरुणांना विचारात न घेताच निर्णय
गेल्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती यावेळी मात्र निवडणूक झाली पाहिजे, अशाच पवित्र्यात आहे. तेच तेच नेते गावांचा खुंटलेला विकास आणि तरुणांना विचारात न घेता घेतलेले निर्णय, यावेळी मात्र तरुण चित्र बदलण्यास उत्सुक आहेत. बिनविरोधला विरोध करत मिळेल त्या पक्षाचे तिकीट मिळवून गावकारभारात सक्रिय होण्यास तरुण उत्सुक आहेत.