बसस्थानकात तरुणाईचा वॉच
By Admin | Updated: January 28, 2015 00:53 IST2015-01-27T21:32:38+5:302015-01-28T00:53:38+5:30
पोलिसांत तक्रार करणार : महिला अन् युवक सरसावले--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची...

बसस्थानकात तरुणाईचा वॉच
सातारा : रात्री-अपरात्री कोणत्याही कारणास्तव महिला किंवा तरूणी जर बाहेर असतील तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि युवक सरसावले आहेत. बसस्थानक परिसरावर आता तरूणाई वॉच ठेवणार आहे.साताऱ्यात रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का, याविषयी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महिलांची सुरक्षितता हा विषय ऐरणीवर आला होता. त्यानंतर समाजातील विविध स्तरांतून याविषयी आवाज उठविला गेला. साताऱ्याचा उल्लेख शूरवीरांचा जिल्हा म्हणून केला जातो. या ओळखीला तडा जाऊ नये आणि येथील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात या उद्देशाने तरूणाई पुढे सरसावली आहे. काही महिलांनीही यात पुढाकार घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री-अपरात्री लक्ष ठेवण्याचा आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना अद्दल घडविण्याचा चंगच बांधला आहे. (प्रतिनिधी)
सातारा महिला व युवतींसाठी सर्वांत सुरक्षित जिल्हा म्हणून ओळखला जावा, त्यासाठी सर्वांनी मिळून जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी तरूणांचे रात्रगस्त पथक सुरू करण्याचा विचार आहे
- अनिकेत क्षीरसागर, विद्यार्थी
बचत गटही होणार सक्रिय
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांची चळवळ साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता बचत गटातील या रणरागिणी आपल्या भगिनींसाठी सरसावल्या आहेत. आर्थिक सबलीकरणाबरोबरच महिलांची इभ्रत सांभाळण्यासाठी शहर व परिसरातील काही बचत गट सक्रियपणे काम करणार असल्याचे संबंधितांनी ‘लोकमत’ला सांगिंतले. बसस्थानक परिसरात जाऊन ‘आॅन दि स्पॉट’ प्रसाद देऊन महिला, युवतींना त्रास देणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारीही या रणरागिणींनी केली आहे.