दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:27+5:302021-04-06T04:38:27+5:30
सातारा : दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर ...

दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकावर कोयत्याने वार
सातारा : दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शरद कांबळे, पिंटू कांबळे, अचित गायकवाड (सर्व रा. प्रतापसिंह नगर सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून यापैकी शरद कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवार, दि. ३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना सातारा शहरालगत असणाऱ्या प्रतापसिंहनगर येथील प्राजक्ता किराणा स्टोअर्सजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आदित्य संदीप झोंबाडे (वय १८, रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) हा युवक सेंट्रींगचे काम करतो. शनिवार, दि. ३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याची आत्या हे दोघेजण लीना बबन थोरात यांच्या घराबाहेर बसले होते. यावेळी आदित्य याला शरद अशोक कांबळे (वय २३), पिंटू गायकवाड, अचित गायकवाड (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या तिघांनी प्राजक्ता किराणा स्टोअर्सजवळ बोलावून घेतले. येथे आदित्य आल्यानंतर त्याच्याकडे दारू पिण्यासाठी या तिघांनी दोनशे रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार देताच या तिघांनी त्याला चिडून जावून शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या भांडणातून आदित्य याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. यावेळी पिंटू याने आदित्यच्या पाठीत दगड घातला तर अचित याने त्याला हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली.
या प्रकारानंतर आदित्य याने दि. ४ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शरद, पिंटू आणि अचित या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी रविवार, दि. ४ रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास शरद कांबळे याला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बधे हे करत आहेत.