खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून खंडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या केसुर्डी उड्डाणपुलालगतच्या सेवारस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. रामनरेश रामजी यादव (वय ३०, मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा.केसुर्डी फाटा, ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामनरेश यादव हा परप्रांतीय असून केसुर्डी फाट्याजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास रामनरेश यादव हा दुचाकी (एमपी ४६ एमजे ४९६८) वरुन केसुर्डी फाट्याच्या सेवा रस्त्याने खंडाळ्याच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच ११ डीआर ८२११) ला रामनरेशच्या दुचाकीची धडक बसली.ही धडक एवढी गंभीर होती की दोन्ही दुचाकींच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. या अपघातामध्ये समोरील दुचाकीवरील रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव (दोघे रा.पारगाव, ता.खंडाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले तर रामनरेश यादवचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी खंडाळा पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीमने तत्काळ धाव घेतली. तोपर्यंत जमलेल्या ग्रामस्थांनी जखमी तिघांनाही खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रामनरेश याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. इतर दोघांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात हलवले.या अपघातप्रकरणी सूरज यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस अंमलदार संजय जाधव हे करीत आहेत.
Satara Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण ठार, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:23 IST