वाईसह परिसराची पर्यटकांना भुरळ!
By Admin | Updated: November 23, 2014 23:49 IST2014-11-23T20:45:31+5:302014-11-23T23:49:17+5:30
नावलौकिक वाढला : नैसर्गिक देणगीमुळे ओढा; शनिवार-रविवार अधिक गर्दी

वाईसह परिसराची पर्यटकांना भुरळ!
वाई : प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे व नैसर्गिक देणगी लाभलेल्या वाई शहर व परिसरात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात शहराच्या परिसरात मोठ-मोठी रेस्टॉरंट, हॉटेल्स व राहण्याकरिता अत्याधुनिक सुखसोयी असलेली लॉजिंग तयार झाल्याने ‘खवैय्यासाठी’ही वाई शहराचा नावनौलिक वाढत चालला आहे.
वाई शहरातून कृष्णा नदी वाहत जाते. तिच्या दोन्ही तीरावर या शहराची निर्मिती प्राचीन काळापासून झाली आहे. कृष्णेच्या तीरावर महागणपती मंदिर, काशी-विश्वेश्वराचे व अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिरे आहेत. येथून चार किलोमीटर अंतरावर मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा, रेखीव घाट, महाकाय घंटा मंदिर, पर्यटकांना व हॉलीवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करतात. वाईपासून आठ किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर ‘धोम धरण’ बांधले असून, अनेक हौशी पर्यटक बोटिंगसाठी येत असतात.
धोममध्येही प्राचीन मंदिरे असून, विहिरीतून नदीपात्रात गायमुखातून सतत पाणी पडत असते. धोम धरणाचा परिसर व कृष्णा नदीच्या काठावरील अनेक भागात जुने वाडे असल्याने गावातील पार, जुन्या विहिरी अशा अनेक नैसर्गिक व प्रेक्षणिय स्थळावर वर्षभर अनेक भाषातील चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. या सर्व कारणामुळे अलीकडच्या काळात वाई शहर व परिसरात अत्याधुनिक सुख-सोयींनी मोठमोठी रेस्टॉरंटे, हॉटेल्स उभी राहिली आहेत. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणीला जाणारे पर्यटक येथे राहणे पसंत करतात.
यामुळे स्थानिक अनेक व्यवसायिक व रोजगारी करणाऱ्यांना काम मिळत आहे. येथील निसर्गसौंदर्याबरोबरच खवैय्यासाठीही या शहराचा नावलौकिक वाढत
आहे. (प्रतिनिधी)