क्रिकेटची मॅच हरल्याच्या रागातून तरुणाचा दाबला गळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 17:14 IST2021-11-21T17:13:46+5:302021-11-21T17:14:08+5:30

सातारा : क्रिकेटची मॅच हरल्याच्या रागातून हर्षवर्धन दाजीराम बेलदार (वय २५, रा. सरडे गावठाण, ता. फलटण) या तरुणाचा एका ...

Young man choked with anger after losing a cricket match | क्रिकेटची मॅच हरल्याच्या रागातून तरुणाचा दाबला गळा!

क्रिकेटची मॅच हरल्याच्या रागातून तरुणाचा दाबला गळा!

सातारा : क्रिकेटची मॅच हरल्याच्या रागातून हर्षवर्धन दाजीराम बेलदार (वय २५, रा. सरडे गावठाण, ता. फलटण) या तरुणाचा एका युवकाने गळा दाबण्याचा प्रयत्न केला; तर इतरांनी त्याला खाली पाडून बेदम मारहाण केली. ही घटना फलटण तालुक्यातील सरडे येथे दि. १८ रोजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सात युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुनील लाला चव्हाण, सोमनाथ छगन चव्हाण, गणेश दत्तात्रय चव्हाण (सर्व रा. सरडे गाव, चव्हाण वस्ती, ता. फलटण) यांच्यासह चार अनोळखी युवक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील सरडे गावच्या हद्दीतील जयवंत दूध डेअरीशेजारी शिवाजी बेलदार यांच्या पडीक शेतात क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन बेलदार याच्या संघाने संशयित युवकांच्या संघाला हरविले. त्यानंतर संबंधित युवकांनी बेलदार याच्या संघाला हरविले. यावरून हे संशयित युवक बेलदार याला शिवीगाळ करत होते. तुम्ही मला का शिव्या देता, असे विचारल्याच्या कारणावरून सुनील चव्हाण याने पाठीमागून येऊन हर्षवर्धन याच्या पाठीत लाथ मारली. त्यामुळे हर्षवर्धन खाली पडला. यानंतर सोमनाथ चव्हाण याने हर्षवर्धनच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर गणेश चव्हाण याच्यासह इतर चार अनोळखी युवकांनी हर्षवर्धनला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर हर्षवर्धन बेलदार याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास सहायक फाैजदार सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Young man choked with anger after losing a cricket match