‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास मारहाण

By Admin | Updated: June 22, 2014 00:17 IST2014-06-22T00:17:17+5:302014-06-22T00:17:39+5:30

गंभीर जखमी : पतंगरावांच्या निवासस्थानावर दगडफेक

The young district of 'Swabhimani' is beaten up | ‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास मारहाण

‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास मारहाण

पलूस/भिलवडी : पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. त्यातूनच पंचायत समिती सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासमोरच घडला. मारहाणीत राजोबा जखमी झाले आहेत. यानंतर स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सांगलीत मंत्री पतंगराव कदम यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली.
पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवार सकाळी साडेअकराला पंचायत समितीच्या आवारात सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित होते. सहा वर्षांनंतर आमसभा होत असल्याने काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्यासंख्येने उपस्थित होते. प्रारंभीच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याबद्दल पालकमंत्री कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्रीकांत लाड यांनी मांडला. त्याला संदीप राजोबा यांनी अनुमोदनही दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी रविकांत आडसूळ यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. याचवेळी संदीप राजोबा यांनी गेल्या उसाच्या एफआरपीबाबत करण्यात आलेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल करत मंचावर जात ध्वनिक्षेपक हातात घेतला. ही पंचायत समितीची आमसभा असून उसाच्या दराचा याठिकाणी संबंध नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सुनावले. त्यातून वादावादी सुरू झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत त्यावरून खडाजंगी सुरू झाली. त्यातूनच काहींनी राजोबा यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांना मंचावरून खाली ओढले आणि मारहाणीस सुरुवात केली. या झटापटीत राजोबा जमिनीवर पडले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. केवळ दोन मिनिटात खुद्द पालकमंत्री कदम यांच्यासमोर घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक झाले. यावेळी कदम ध्वनिक्षेपकावरून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत होते.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव करत राजोबा यांना सभेबाहेर नेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. केवळ पाऊण तासात आमसभा आटोपती घेण्यात आली. मारहाणीची बातमी काही वेळातच पलूस-कडेगाव तालुक्यांत पसरली. दुपारनंतर राजोबा यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पलूस शहर बंद केले. (वार्ताहर)

Web Title: The young district of 'Swabhimani' is beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.