कसणी-मस्करवाडीतील ग्रामस्थांना पावसाळ्यात डोंगर कपारीतून पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने आरोग्याच्या सुविधा सर्वत्र उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांची साडेसाती अद्याप संपलेली नाही.
कसणी-मस्करवाडीत आरोग्य सुविधा पोहोचविण्यास दुर्लक्ष केले जात आहे. कसणीतील ग्रामस्थांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरोग्य केंद्रासाठी मागणी केली होती. त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर तो चौकशीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र, आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- चौकट
अनेक गावांची सोय
निवी, कसणी, बौद्धवस्ती, चोरगेवाडी, सतीचीवाडी, मस्करवाडीवाडी, निनाईचीवाडी, धनगरवाडा, काळगाव, विनोबांचीवाडी, निगडी, धनावडेवाडी, माईगडेवाडी, महाळुंगेवाडी, गणेशवाडी गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवेची गरज आहे. कसणीत आरोग्य केंद्र झाल्यास संबंधित सर्व गावांतील ग्रामस्थांची सोय होणार आहे.
- चौकट
पाटण तालुक्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत आहे. एका बाजूला वांग-मराठवाडी प्रकल्प तर दुसºया बाजूला चांदोली धरण आहे.
- कोट
कसणी विभागातील ग्रामस्थांना आजारी पडल्यास उपचार घेण्यासाठी ढेबेवाडी तसेच इतर ठिकाणी जावे लागते. त्यासाठी पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर पार करून डोंगर कपारीतून जावे लागते. याठिकाणी रस्त्याची गैरसोय आहे. प्राण्यांचीही भीती आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे येथे आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे.
- मारूती मस्कर, अध्यक्ष
निनाईदेवी शिक्षण संस्था, कसणी