शेणोलीच्या अकलाई देवीची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:52+5:302021-03-23T04:41:52+5:30
वडगाव हवेली : शेणोली, ता. कऱ्हाड येथील ग्रामदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अकलाई देवीची यात्रा रविवार, २८ मार्चपासून ...

शेणोलीच्या अकलाई देवीची यात्रा रद्द
वडगाव हवेली : शेणोली, ता. कऱ्हाड येथील ग्रामदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अकलाई देवीची यात्रा रविवार, २८ मार्चपासून मंगळवार, ३० मार्चपर्यंत होणार आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व यात्रा समितीची एकत्रित बैठक झाली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. यात्रेतील पारंपरिक बैलगाडा मिरवणूक, पालखी मिरवणूक, सर्व धार्मिक विधी तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित न करण्याचे या वेळी एकमताने ठरले. सरपंच जयवंत उर्फ विक्रम कणसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. परंपरेनुसार होळी दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. धूलिवंदन दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही करमणुकीचे कार्यक्रम होतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सुवर्णपदक विजेत्या हृषीकेशचा सत्कार
कार्वे : रायपूर-छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा खेळाडू हृषीकेश ज्ञानेश्वर जगताप याने सुवर्णपदक मिळवले. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयाचा तो विद्यार्थी असून त्याने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. रायपूर छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील खेळाडूंचा सहभाग होता. त्यामध्ये महाराष्ट्र संघातून हृषीकेश याने सुवर्णपदक मिळवले. सत्कारप्रसंगी विनायक भोसले, कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य सी.बी. साळुंखे, प्रा. संजय पाटील, प्रा. विशाल साळुंखे उपस्थित होते.
पाटण तालुक्यात पथनाट्यातून प्रबोधन
मल्हारपेठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या ‘लोकल फॉर व्होकल’ उपक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क विभागामार्फत पाटण तालुक्यात पथनाट्याद्वारे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. पाटण तालुक्यातील पाटण, कोयना, येराड, नवारस्ता, मल्हारपेठ, चाफळ फाटा येथे सातारा येथील शाहीर श्रीरंग रणदिवे या कलापथक मंडळाच्या कलाकारांनी शाहिरी शैलीतून कोरोना हटाव महाराष्ट्र बचाव, कोरोना हटाव देश बचाव, माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत प्रबोधन केले.
विंगच्या विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान
कुसूर : विंग, ता. कऱ्हाड येथील आदर्श विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक बी. बी. मोरे, पर्यवेक्षक एस. एस. यादव यांच्या हस्ते जनाबाई डोळे, सुमन आवले आणि स्वाती जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यू. एस. गलांडे, यू. जे. बिचुकले, दीपाली बामणे, योगेश सनदी, एस. व्ही. सावंत, एन. आर. पाटील, बी. बी. कुंभार, एस. व्ही. जाधव, मनीषा पाटील, डी. जे. निकम, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक
उंडाळे : येवती ते पाटीलवाडी या तीन किमी अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काही वेळा या झाडा-झुडुपांमुळे अपघात घडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.