यमाईदेवी यात्रेस आज प्रारंभ
By Admin | Updated: January 5, 2015 00:40 IST2015-01-04T21:25:29+5:302015-01-05T00:40:36+5:30
दीपोत्सवाचा सोहळा : छबिना, दीपमाळ प्रज्वलनाने उजळणार परिसर

यमाईदेवी यात्रेस आज प्रारंभ
औंध : श्री यमाईदेवीच्या यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे. आज (सोमवारी) सायंकाळी सात वाजता औंध येथील राजवाड्यासमोरील ऐतिहासिक दीपमाळ प्रज्वलित केली जाणार आहे. या दीपमाळेने संपूर्ण औंध परिसर तेजोमय होणार आहे. दीपमाळ प्रज्वलित झाल्यानंतर श्री यमाईदेवीची पूजा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते झाल्यानंतर देवीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा म्हणजे छबिन्याचा कार्यक्रम होईल.
औंधची दीपमाळ ऐतिहासिक व परंपरेचे द्योतक आहे. काळ्या पाषाणात बांधलेली ६५ फूट उंच असलेली महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्मीळ अशी कलाकृती आहे. दीपमाळ इतकी उंच असूनही तिच्या प्रज्वलनासाठी कशाचाही आधार घेतला जात नाही. दीपमाळेवर विविध आकारांची दगडी पायऱ्या हजारोंच्या संख्येत आहेत.
दीपमाळचा वापर संस्थान काळापासून दीपप्रज्वलित करण्यासाठी केला जातो. प्रथम दीपमाळेच्या सर्वात वरील कुंड पेटविला जातो. त्यामध्ये पेंढ, सुपाऱ्या, तेल व ज्वालाग्रही वस्तू टाकून पेटविली जाते. महाराष्ट्रातील ही सर्वात उंच आणि दुर्मिळ कलाकृती असल्याने राज्यभरातून अनेक भाविक हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी येतात.
औंधचा ऐतिहासिक ठेवा जतन करणारी ही दीपमाळ दिमाखात उभी आहे. शाकंभरी पौर्णिमेला दीपप्रज्वलनाचा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविक आवजून उपस्थित राहतात.
औंधच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध क्रीडास्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्वान, क्रिकेट सामने, पाककला, शरीर सौष्ठव स्पर्धा, गिर्यारोहण, पोहणे तसेच कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले
आहे. (प्रतिनिधी)