येळगावकरांची गोची.. नाचता येईना; मांजर आडवे!
By Admin | Updated: August 22, 2014 22:06 IST2014-08-22T21:36:36+5:302014-08-22T22:06:40+5:30
भाजपप्रवेश टांगणीला : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अवस्थेमुळे कायकर्ते अस्वस्थ

येळगावकरांची गोची.. नाचता येईना; मांजर आडवे!
सातारा : राष्ट्रवादीला रामराम करून बाहेर पडलेल्या दिलीप येळगावकर यांच्यासाठी भाजपप्रवेश म्हणजे ‘नाचता येईना... मांजर आडवे’ असेच झाले आहे. माझ्या प्रवेशाला काळी मांजरे आडवी येत असल्याचे सांगून त्यांना कोणावर निशाणा साधायचा होता, हे जिल्ह्यातील पक्षनेत्यांनाही उमगलेले नाही. मात्र, ही ‘काळी मांजरे’ त्यांच्याच माण, खटाव तालुक्यांतील असल्याची चर्चा आहे.
येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडून दोन महिने संपत आले तरी भाजपकडून त्यांना प्रवेश देण्याबाबत अजून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी घेतलेले विनोद तावडे यांच्या दौऱ्यातही येळगावकर दिसले नाहीत. त्याबाबत तावडेंना विचारणा झाली असता त्यांनीही निरुत्साही होतच उत्तर दिले.
येळगावकरांचा दि. ११ आॅगस्ट रोजीच भाजपप्रवेश होणार होता. मात्र, तो झाला नाही. यानंतर अशी माहिती पुढे आली की, येळगावकरांना भाजपकडून ‘कोणतातरी शब्द’ तर हवा आहेच. त्याचबरोबर त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे-पालवे उपस्थित हव्या होत्या. परिणामी ही प्रक्रिया रखडली. माण मतदारसंघ ‘रासप’कडे राहील, अशीही चर्चा पुढे आली आणि येळगावकरांची गोची झाली. राष्ट्रवादीही सोडली आणि भाजपमधूनही प्रतिसाद मिळेना, अशा कात्रीत ते सापडले आहेत.
येळगावकरांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिन्यात माण-खटाव भाजपची दहिवडीत गुप्त बैठक झाली आणि येळगावकरांना विरोध करणारा ठराव झाला. त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी मागणीही झाली. त्या ठरावाची प्रत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आली आहे. येळगावकर ज्या पक्षातून आमदार झाले, त्याच पक्षाला त्यांनी राष्ट्रवादीत जाताना असभ्य भाषा वापरली होती, असा उल्लेख या ठरावात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)