पेट्रोलसाठी वाई-महाबळेश्वरची वारी
By Admin | Updated: January 15, 2015 23:30 IST2015-01-15T21:38:11+5:302015-01-15T23:30:22+5:30
वाहनधारकांची गैरसोय होत आहे. कंपनीकडे याबाबत पाठपुरवठा सुरू आहे. यावर तोडगा निघून पंप लवकरच सुरू होईल.

पेट्रोलसाठी वाई-महाबळेश्वरची वारी
पाचगणी : पाचगणी येथे असणारा एकमेव पेट्रोल पंप तब्बल पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरातील वाहनाधारकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय झाली असून वाहनधारकांना पेट्रोल भरण्यासाठी पाचगणीहून १३ किलोमीटर आंतरावर असणाऱ्या वाई तर १९ किलोमीटर लांब असणाऱ्या महाबळेश्वरला जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे.
पाचगणी शहर हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सतत सुरू असते. असे असताना नव्या वर्षाच्या स्वागतापासूनच पेट्रोल टंचाईमुळे वाहनचालक व पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. शहरात असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल मिळत नसल्याने वाहनचालकांना वाई आणि महाबळेश्वरची वारी करावी लागत आहे.भारत पेट्रोलियम कंपनी व पेट्रोलपंप मालकांच्या कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीत वाहनचालकांचे मात्र हाल होत आहे. पंधरा दिवसांपासून ही परिस्थिती ‘जैसे थै’ आहे. त्यामुळे संबंधित मालकांनी आपआपसातील तांत्रिक अडचणी सोडवून नागरिकांची होणारी होणारी गैरसोय तत्काळ दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत
आहे. (प्रतिनिधी)
गेल्या तीस वर्षांपासून आम्ही भारत पेट्रोलियम मार्फत पेट्रोल विक्री करत आहोत. आजपर्यंत कागदपत्रांविषयी कोणतीही अडचण आली नव्हती. परंतु १ जानेवारी रोजी कंपनीने कागदपत्रांची तांत्रिक अडचण सांगून पाचगणी ट्रेडिंग कंपनीचा पेट्रोल डिझेल पुरवठा बंद केला आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. कंपनीकडे याबाबत पाठपुरवठा सुरू आहे. यावर तोडगा निघून पंप लवकरच सुरू होईल.
अन्वर काझी, व्यवस्थापक, पाचगणी ट्रेडिंग कंपनी