जखमा भरतायत पण नाती तुटतायत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:38+5:302021-09-03T04:41:38+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून ...

जखमा भरतायत पण नाती तुटतायत !
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून विवाहबध्द झालेल्या जोडप्यांमध्ये होणारे वादंग पोलीस ठाण्यात जात असल्याने अवघ्या कुटुंबाचे आरोग्य बिघडत आहे. पुरुषांकडून शारीरिक मारहाण आणि महिलांचे शाब्दिक हल्ले परतवणं अनेक जोडप्यांना आता असहय्य होऊ लागलं आहे.
महाबळेश्वर येथील राजेंद्र उर्फ राजू जाधव याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पन्नाशी ओलांडलेल्या या संशयितावर मानसिक आजार असल्याने उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मानसिक स्थिती ठीक नसतानाही पत्नीला ठार करण्याची योजना आखण्यात, मुलं बाहेर येऊ नयेत म्हणून दाराला कुलूप लावणं, पत्नीच्या येण्याच्या मार्गावर दबा धरून उभं राहणं यासाठी मात्र त्याचा मेंदू शाबूतपणे काम करतोय हे अजब आहे.
पती-पत्नी एका कुटुंबाचे भाग असले तरीही ती दोन व्यक्तिमत्त्व आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार दोघांनाही परस्परांचे सगळेच पटेल असं गृहित धरणं धोक्याचं आहे. मी सांगेल तसेच झाले पाहिजे ही अतिरेकी अपेक्षा या वादांच्या मुळाशी असल्याचं दिसते. एकमेकांच्या साथीने कुटुंबासह एकदाच मिळणारं आयुष्य आनंदाने जगण्याचं सोडून चारित्र्याचा संशय, व्यसनाची कटकट म्हणून परस्परांना हिनवणं अयोग्य आहे. त्यामुळे कलह आणि कायदेशीर लढाई हेच पदरी पडते.
कोणतीही हिंसा घातकच
शारीरिक असो वा शाब्दिक कोणत्याही प्रकारची हिंसा ही घातकच असते. राग आला म्हणून पत्नीला मारणारे महाभाग आणि त्यांचे समर्थन करणारे कुटुंबीय आजही अस्तित्वात आहेत. तर रागाच्या भरात अगदी खालच्या थराला जाऊन कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या महिलांचं वागणं योग्य असल्याचे सांगणारेही ढिगाने पहायला मिळतात. राग आला की मारहाण किंवा शिवीगाळ हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत हेच अनेकांच्या मनावर बिंबवले जाते. या दोन्हीपेक्षाही संवादाचा मार्ग सुखकर आणि कमी त्रासाचा आहे ही शिकवणच मिळत नाही हे दुर्दैवी आहे.
अशी होतेय कोंडी...!
लग्नाचे काही वर्ष परस्परांसह कुटुंबीयांना समजून घेण्यातच जातात. नवी नाती जोडताना महिलांसह पुरुषांचीही कोंडी होती. तुमच्यासाठी घरदार सोडून आले, असा पत्नीचा सूर असतो. कौटुंबिक कलह सोडविण्याचं काही सूत्र नसतं त्यामुळे घरचे वाद संपुष्टात आणायला पतीला हतबलता जाणवू लागली की तो आक्रमक होऊन मारहाण करतो. पती-पत्नी त्यांच्या जागेवर योग्य असले तरीही तडजोड करणं हे संसाराचं सूत्र मानलं तर आयुष्य अधिक सुखकर होईल.
कोट :
संवाद असेल दोघांत तर संसार होईल सुखात हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवायला हवा. आयुष्य क्षणभंगूर आहे हे समाजाला कोरोनाने शिकविले आहे. माणसं, नाती, भावना, प्रेम जपायलाच हवे. कोणाविषयी राग आलाच तर चांगले क्षणही आठवा. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची मानसिकता नक्की बदलेल.
- ॲड. मनीषा बर्गे, जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग
पॉइंटर
राग व्यक्त करण्याचे प्रकार
मारहाण : ४३
शिवीगाळ : २७
घर सोडून जाणे : १९
कुटुंबीयांना वेठीस धरणे : ११