एकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:01 IST2019-09-10T15:59:35+5:302019-09-10T16:01:53+5:30
सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता.

एकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट
सातारा : शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता.
हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहरमला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ताबुतांच्या पंजांची स्थापना करण्यात आली. मंगळवारी मोहरम महिन्याच्या दहाव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात शहरातून ताबूत व पंजांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
साताऱ्यातील जंगीवाडा येथील जंगीसाहब या ताबुताला १५० वर्षांपूर्वीची मोठी परंपरा आहे. या ताबुताच्या दर्शनासाठी जिल्ह्याबाहेरून भाविक येत असतात. मौलाअली, कवडी पीर, बेबी फातिमा, घोडे पीर आदी ताबुतांची स्थापना शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आली होती. सोमवारी कत्तल की रात या दिवशी मानवी वाघांची मिरवणूक काढण्यात आली होती. या वाघांनी ताबूत व पंजांची भेटी घेतल्या. या भेटी पाहण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती.
इस्लामी नववर्षाची सुरुवात मोहरम महिन्याने होते. नवव्या व दहाव्या दिवशी अनेक मुस्लीम बांधव ऐच्छिकपणे रोजा धरत असतात. मिरवणुकीनंतर गरिबांना दानधर्म आणि अन्नधान्य देण्याची मुस्लीम बांधवांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार अनेक मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीनंतर शेवटी गरीब लोकांना अन्नदान तसेच सरबताचे वाटप करण्यात आले.
अनेक मंडळांकडून स्वागत..
मागील वर्षापासून गणपती व मोहरम सण एकत्र येत असल्याने अनेक ठिकाणी ताबूत व गणपतीची एकाच ठिकाणी स्थापना करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते. विसर्जनादिवशीही अनेक ठिकाणी विविध मंडळांनी विसर्जन मिरवणुकीतील ताबूत, पंजांचे स्वागत केले. त्यामुळे ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.