कोरेगावच्या मदतीला जागतिक बँक धावली
By Admin | Updated: June 5, 2015 00:14 IST2015-06-04T23:08:06+5:302015-06-05T00:14:54+5:30
30 कोटींच्या आराखड्यास मंजूरी : नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी निधीची तरतूद

कोरेगावच्या मदतीला जागतिक बँक धावली
कोरेगाव : कोरेगाव शहराला पुढील २५ वर्षातील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी सुमारे ३० कोटी रुपयांच्या सुधारीत आराखड्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती नगर विकास कृती समितीचे संघटक राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे व संतोष नलावडे यांनी दिली.शहरातील अपुरा पाणी पुरवठा, कचऱ्याचे साम्राज्य आणि सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी नगर विकास कृती समितीने जलसंपदा मंत्री असताना आ. शशिकांत शिंदे यांना आॅगस्ट २०१४ मध्ये एक निवेदन सादर केले होते. कृती समितीने तीळगंगा नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती देत या कामाला भासणारी निधीची कमतरता व पुढील २५ वर्षात वाढणाऱ्या समस्यांचा एक अहवाल आ. शिंदे यांना दिला होता, त्यानुसार आ. शिंदे यांनी तातडीने जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करुन कोरेगावसाठी नवीन पाणी योजना उभारता येईल काय याबाबत सूचना दिल्या होत्या.त्याच दरम्यान जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव मागणीला काही दिवस उरलेले होते. नगर विकास कृती समितीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ६ सप्टेंबर २०१४ रोजी आ. शिंदे यांच्या शिफारसीने जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोरेगावचा समावेश होण्यासाठी समितीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा परिषदेकडे केली होती. याकामी अधिकारी कोळी, प्रकल्प प्रमुख पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी मिळवली. नव्या ४.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या या पाणी योजनेमध्ये नव्या उपसा विहीरीसह जलवाहिन्या, पंपगृह, उच्च अश्वशक्तीची पंप मशिनरी, दाबनलीका, २.५ दशलक्ष लिटर क्षमेतेचे पाणी शुध्दीकरण केंद्र, रेल्वेस्टेशन परिसर, जुन्या गावठाण परिसर व दत्त नगर या तीन ठिकाणी उंच पाणी साठवण टाक्या व अत्याधुनिक वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ११. ४३ कोटी रुपयांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या नव्या योजनेमुळे प्रतीमाणसी १३५ लिटर पाणी उपलब्ध होणार असून या संपूर्ण प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.
तीन्ही नव्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच विद्या येवले, उपसरपंच मंदा बर्गे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रायमो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे अधिकारी राहुल कुंभार, जलस्वराज्य प्रकल्पाचे अधिकारी पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी प्रकल्पाची माहिती
दिली. (प्रतिनिधी)
अत्याधुनिक घनकचरा निर्मुलन प्रकल्प लवकरच
संपूर्ण शहरात भुयारी गटर योजना कार्यान्वित करुन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पही उभारण्यात येणार असून शहरातील सर्व सांडपाणी तीळगंगा नदी पात्रास मिसळत असते, त्या पाण्यावर सहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, तर शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी अत्याधुनिक घनकचरा निमूर्लन प्रकल्प उभारण्यात येणार असून सुमारे अडीच एकर जागेत होणाऱ्या या प्रकल्पामुळे कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १८.८९ कोटींचा खर्च अपेक्षीत असून या प्रकल्पासाठीही जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.