कार्यकर्त्यांचा गोंधळ, सभासदांची पळापळ

By Admin | Updated: September 29, 2014 23:58 IST2014-09-29T23:56:57+5:302014-09-29T23:58:56+5:30

कृष्णेच्या सभेत गोंधळ : सात मिनिटांत सभा गुंडाळली; प्रवेशद्वारावर विरोधकांची प्रतिसभा

Workers 'confusion, members' agitation | कार्यकर्त्यांचा गोंधळ, सभासदांची पळापळ

कार्यकर्त्यांचा गोंधळ, सभासदांची पळापळ

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटांच्या कार्यकर्त्यांमधील परस्पर विरोधी घोषणाबाजी, धक्काबुक्की, चप्पलफेक आणि हमरीतुमरीमुळे सभा अवघ्या सात मिनिटांत आटोपण्यात आली़
रेठरे बुद्रुक, ता़ कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सन २०१३-१४ च्या अधिमंडळाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अविनाश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती़
विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे ८५ प्रश्न कारखाना विरोधी गटाचे नेते डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी लेखी स्वरूपात विचारले होते़ अन् मोहिते गटाचे नेते आपल्या सभासद कार्यकर्त्यांसह या सभेला उपस्थित रहाणार होते़ त्यामुळे या सभेत गोंधळ होणार, अशी शक्यता परिसरातील लोकांमधून सुरू होती़ त्या दृष्टीने संचालक मंडळाने सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त व सुरक्षित बैैठकव्यवस्था केली होती़
दुपारी दीड सुमारास कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते सभामंचकावर उपस्थित झाले़ यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, अशोकराव थोरात तसेच सर्व संचालक व विविध मान्यवर उपस्थित होते़ दुपारी दोन वाजता उपाध्यक्ष सुरेश पाटील उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी व्यसपीठावर उभे राहिले, त्याच दरम्यान, डॉ़ इंद्रजित मोहिते व कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते़ आपल्या सभासद कार्यकर्त्यांसह सभास्थळी दाखल झाले़
घोषणाबाजी करत मोहिते गटाचे नेते व कार्यकर्ते सभामंडपात येत असताना गेटवरती पोलीस व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्यास अटकाव केला़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली़ लगेच सत्ताधारी व विरोधी गटाने आपापल्या नेत्यांच्या नावाने घोषणा सुरू केल्या़ यातच कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी, धक्काबुक्की सुरू झाली़ गोंधळ वाढतच गेल्याने सत्ताधारी गटाच्या एका कार्यकर्त्याने व्यासपीठावरून विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर-मंजूर म्हणून जाहीर करताच विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने चप्पलफेक केली़ सभामंडपातील या गोंधळामुळे बसलेले सभासद जागा मिळेल, त्या दिशेने सैरभैर पळू लागले़ हो गोंधळ सुरू असतानाच कारखान्याचे विद्यमान अध्यक्षांनी व्यासपीठावरून सभासदांना शांत राहण्याचे आवाहन करत भाषणाला सुरुवात केली़ मात्र, सर्वजण गोंधळ करत इकडे तिकडे पळापळी करत होते़

Web Title: Workers 'confusion, members' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.