कोल्हापुरी चपलींची क्रेझ वाढल्याने कारागिरांना काम

By Admin | Updated: March 14, 2016 22:03 IST2016-03-14T22:03:51+5:302016-03-14T22:03:51+5:30

साताऱ्यातही तरुणाईसाठी ट्रेंड : रखरखत्या उन्हात कराकरा वाजणाऱ्या वहाणांना मागणी

The work of the craftsmen for the growth of the kolhapuri chapli cadres | कोल्हापुरी चपलींची क्रेझ वाढल्याने कारागिरांना काम

कोल्हापुरी चपलींची क्रेझ वाढल्याने कारागिरांना काम

सातारा : तेराव्या शतकापासून इतिहास असणाऱ्या चामडी कोल्हापुरी चप्पलला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. कराकरा वाजणाऱ्या या चपलामुळे व्यक्तिमत्व वाढत असल्याने या चपलांना युवक वर्गाकडून पसंती मिळत आहे. यामुळे आजही या चपलामुळे कारागिरांच्या हाताला काम मिळत आहे.
पूर्वी ग्रामीण भागामध्येच ही चप्पल वापरली जात होती. त्यामुळे अशी चप्पल वापरणारी व्यक्ती ही ग्रामीण भागातील आहे, अशी समज होती. यानंतर या चप्पलला सरपंच, नेते मंडळी, कार्यकर्ते घालून रस्त्याने कराकरा करत आपला रुबाब झाडत होते. आतातर बघता बघता ही चप्पल तरुणाईलाही आकर्षित करू पाहत आहे. जीन्स, फॉर्मल, पॅन्ट, कुर्ता यालाही कोल्हापुरी चप्पल अगदी शोभून दिसत असल्याने सध्या या चपलीकडे तरुण वर्ग वळला आहे.
उन्हाळ्यात पायाला होणारी दाहकता चामडी चप्पलीमुळे कमी होत असल्यामुळे या चप्पलला उन्हाळ्यात अधिक मागणी असते. साधारण ४०० रुपयांपासून मिळणारी ही चप्पल अगदी दोन ते तीन वर्षे टिकत असल्याने या चप्पलला जुनी जाणती मंडळी आजही पसंती देत आहेत. साताऱ्यात काही ठराविक ठिकाणी या चप्पल विक्रीस मिळतात. तर काही मोजकेच कारागीर या चप्पल बनवून देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या पूर्वीच त्यांच्याकडे अशा चप्पलीची मागणी होत असते. शहरातील काही दुकानामध्ये अशा चप्पला विक्रीला आल्या आहेत. एक चप्पल बनविण्यासाठी दोन ते तीन दिवस जातात. त्यामुळे मागणीनुसारच चप्पल बनवावी लागत असल्याचे एका कारागिराने सांगितले. तसेच प्रत्येक उन्हाळ्यात जवळपास हजार ते बाराशे चपलींना मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


करकर वाजणारी
चप्पल प्रसिद्ध
कोल्हापुरी चप्पलाचे कापशी, कुरुंदवाडी पायताण असे प्रकार आहेत. सध्या यात अनेक बदल होत गेले असून, कोल्हापुरी चप्पलमध्येही अनेक प्रकार आले आहेत. परंतु आजही करकरा वाजणाऱ्या कोल्हापुरी चप्पललाच मोठी मागणी आहे.

अशी बनते चप्पल..
चामडी चप्पल ही हातानेच बनविली जाते. चप्पल आकर्षक दिसावी म्हणून चामडी गोंडे सुद्धा लावली जातात व पॉलिश करून ही चप्पल आकर्षित करण्यात येते.

अस्सल चामड्यापासून बनविलेली चप्पल ही आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. उन्हाळ्यात पायांना व डोळ्यांना थंडावा देण्याचे काम यातून होते. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होतो.

Web Title: The work of the craftsmen for the growth of the kolhapuri chapli cadres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.