शब्दसुरांची आगळी
By Admin | Updated: December 1, 2014 00:21 IST2014-11-30T21:19:48+5:302014-12-01T00:21:12+5:30
सखींनी दिली दाद : संगीत रंगभूमीच्या अजरामर योगदानाची झाली आठवण

शब्दसुरांची आगळी
सातारा : महाराष्ट्रात रुजलेल्या संगीत रंगभूमीला विद्याधर गोखले, राम गणेश गडकरी, कु
सुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीची किनार लाभली. अनेकांची लेखणी अजरामर झाली. या अजरामर नाट्यसंगीतील शब्दसुरांची आगळी मैफल शाहू कला मंदिरमध्ये साजरी झाली. या मैफलीतून संगीत रंगभूमीसाठी अजरामर योगदान देणाऱ्या परीसतूल्य व्यक्तिमत्त्वांना मानवंदना वाहण्यात आली. निमित्त होतं ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित ‘मानवंदना’ या कार्यक्रमाचं!
शाहू कला मंदिरमध्ये आयोजित केलेल्या या श्रवणीय कार्यक्रमाला प्रकृती हेल्थ रिसॉर्ट, जिजाऊ प्रतिष्ठान व जोशी हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी, कल्याणी जोशी, गौतम मुरुडेश्वर, प्रदीप पटवर्धन, विजय गोखले यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थित सखींच्या मनाचा ठाव घेतला. मराठी कवी, नाटककार, लेखक यांनी सांस्कृतिक, मनोरंजन व साहित्य क्षेत्रात दिलेलं योगदान कृतज्ञपणे व्यक्त करण्याचा ‘मानवंदना’चा हा प्रयत्न सातारकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. या कलाकारांनी ‘पुण्यप्रभा, भावबंधन, एकच प्याला’ या नाटकांतील प्रसंग सादर केले. या प्रसंगानुरूप केले गेलेले भाष्य विशेष उल्लेखनीय ठरले. आम्ही सादर करत आहोत ती गप्पांमधील गाणी आहेत, असं विघ्नेश जोशींनी सांगितलं. सादरीकरणाचा हा आगळा प्रकार मात्र सखींना चांगलाच भावला. एखाद्या प्रसंगातील संवादावर हास्याचे फवारे फुलत होते. तर आपल्या संसारात पती-पत्नीच्या नात्याला किती महत्त्व आहे, हेही पटवून दिले.
कवी कुसुमाग्रजांचे ‘गरजा जयजयकार...क्रांतीचा गरजा जयजयकार’ या गीताने क्रांतीचे बळ चेतवले. तर ‘हसरा-नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला’ या गाण्याने मार्गशिर्षातही श्रावणाचा आनंद मिळवून दिला. कवी मंगेश पाडगावकरांच्या ‘माझे जीवन गाणे...’या गीताने रसिकतेची भावना आणखी गडद केली.
‘इथे ओशाळला मृत्यू’ आणि ‘एकच प्याला’ या दोन नाटकातील विचार करायला लावणारे प्रसंगही यावेळी सादर झाले. (प्रतिनिधी)
सुनीता जाधव सुवर्ण नथीच्या विजेत्या
मानवंदना कार्यक्रमावेळी जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार व लाहोटी कलेक्शनच्या किरण लाहोटी यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. सुनीता विलास जाधव या सुवर्ण नथीच्या मानकरी ठरल्या.