महिलांनी घेतला सौभाग्याचा वसा

By Admin | Updated: January 15, 2015 23:29 IST2015-01-15T22:20:25+5:302015-01-15T23:29:28+5:30

चाफळ : राममंदिरात मकरसंक्रांतीसाठी महिलांची मोठी गर्दी

Women take good luck fat | महिलांनी घेतला सौभाग्याचा वसा

महिलांनी घेतला सौभाग्याचा वसा

चाफळ : ‘तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा, तीळ गुळ घ्या गोड बोला, वसा घ्या वसा, अखंड सौभाग्याचा वसा, अशा एक ना अनेक संदेशांनी गजबजलेल्या येथील श्रीराम मंदिरात गुरुवारी सीतामाईची यात्रा भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली. यावेळी लाखो सुहासिनींनी मकर संक्रातीचे औचित्य साधून सीतामाईच्या साक्षीने अखंड सौभाग्याचा वसा घेतला.
दक्षिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांबरोबर परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तीर्थक्षेत्र चाफळला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्रासह पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा देऊन शासन दरबारी नोंद केली आहे. येथील श्रीराम मंदिरात सन १९८५ पासून सीतामाईची यात्रा भरविण्यात येते. संक्रातीला सीतामाईचे दर्शन घेऊन वसा घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी महिलांची श्रद्धा असल्याने या यात्रेला आजही महत्त्व आहे. सलग तीन वर्षे हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी भावना महिलांमध्ये वाढिला लागल्याने याठिकाणी दरवर्षी महिलांच्या संख्येत वाढ होत आहे.
सीतामाई यात्रेसाठी गुरुवारी सकाळपासूनच मंदिराच्या आवारात महिलांनी गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास महिलांच्या गर्दीत वाढ झाल्याने महिला मिळेल त्या ठिकाणी विडे मांडून पूजा करत होत्या. वसा घेत असताना महिला सुगडीमध्ये तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, शेंगा, हरभरा, पावटा, हळदी कुंकू घेऊन श्रद्धापूर्वक सीतामाईच्या साक्षिने खाऊ च्या पानावर खोबरे, खारिक, सुपारी ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटीत घालत होत्या. त्यामुळे मंदिर परीसरात सुगड्यांचा जागोजागी खच पडल्याचे दिसून येत होते.
सीतामाईचे दर्शन व्यवस्थित घेता यावे म्हणून श्रीराम देवस्थान ट्रस्टने चांगली सोय केली होती. यात्रेसाठी कोल्हापूर, पुणे, सातारा, कऱ्हाड, पाटण, सांगली, रत्नागिरी, सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला दाखल झाल्या होत्या. महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी समर्थ विघालयाचे सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एस.पी च्या ७० विद्यार्थी-विद्यार्थीनींनी अथक परिश्रम घेत होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कऱ्हाड उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम.के.पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, गिरीश गायकवाड, रेखा दुधभाते, महिला सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, रवींद्र शिंंदे आदिंंच्या देखरेखीखाली एकूण १०० कर्मचारी, होमगार्डनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

बांधकाम विभागाची ढिलाई
सीतामाई यात्रेच्या पाश्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने चाफळ फाटा ते चाफळ या मार्गावर खड्डे, साईड पट्या भरुन रस्ता वाहतूक सुस्थितीत करण्याच्या सूचना नायब तहसीलदार विजय माने यांनी दिल्या होत्या. मात्र तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने माजगाव ते चाफळ दरम्यानचे बहुंताश खड्डे न मुजवल्याने दोन दुचाकी खड्यात जाऊन दोनजण किरकोळ जखमी झाल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Web Title: Women take good luck fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.