घरात घुसून महिलांना मानसिक त्रास

By Admin | Updated: May 3, 2017 23:18 IST2017-05-03T23:18:40+5:302017-05-03T23:18:40+5:30

‘मनसे’चा आरोप : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानीच्या निषेधार्थ उपोषण

Women get mental trauma after entering the house | घरात घुसून महिलांना मानसिक त्रास

घरात घुसून महिलांना मानसिक त्रास



सातारा : कर्जधारक महिलांना अपशब्द वापरून, अश्लील शेरेबाजी व वेळी अवेळी घरात घुसून मानसिक त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनी प्रतिनिधींच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, दि. ३ मे पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
‘मनसे’च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील हजारो महिलांना विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले आहे. गावोगावच्या होतकरू व गरजू महिलांना केवळ आधारकार्ड व रेशनकार्डच्या पुराव्यांवर आणि कोऱ्या धनादेशवर सह्या घेऊन कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यांच्या वसुलीपोटी संबंधित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कृतींद्वारे कर्जदार महिलांचे जगणे हैराण केले आहे. या कर्जप्रकरणी कर्ज अदा करण्यापासूनच फसवणुकीस सुरुवात होताना दिसते.
गरजू महिलांच्या अडीअडचणीचे भांडवल करून त्यांना चुकीची माहिती सांगून संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतात. तोंडी माहिती वेगळी, कागदपत्रांवर भलतीच माहिती असे कर्जवसुली बाबत निराळेच धोरण असल्याचे दिसून येत असून, हा सर्वच व्यवहार संशयास्पद आहे, असा आमचा आरोप आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी नेमलेल्या वसुली प्रतिनिधींची शैक्षणिक पात्रता नववी, दहावी, बारावी नापास अशी आहे. त्यांना कर्जवसुलीचे कोणतेही ज्ञान नाहीच व माता-भगिनींशी कसे वर्तन करावे याचीही अक्कल त्यांना नाही. त्यांच्याकडून महिलांच्या कर्जाची वसुली नियमबाह्य केली जात आहे व ते हंगामी कामगार असल्यामुळे त्यांना महिलांबाबत आत्मीयता दिसून येत नाही. तसेच त्यांच्याकडून महिलांच्या कर्जाची वसुली करून त्यांचे कर्ज खात्यात जमा न करता रक्कमेचा अपहार केल्याचे बहुतांशी ठिकाणी दिसून येते.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या भगिनी संगीता काटे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले) यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे, अशी घटना आपल्या राज्यात इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोरगरीब, कष्टकरी माता-भगिनींचे मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज माफ व्हावे, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब, कष्टकरी माता-भगिनींना कर्ज देताना १२ टक्क्यांच्या वर त्यांना व्याजदर घेऊ देणार नाही. या प्रश्न संबंधित फसवणूकग्रस्त महिलांनी प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे केलेल्या तक्रारी अर्जानुसार संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित महिलांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी आमची निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्यासह मराठा महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर जाधव व शिवाजी प्रकाश पाटील व ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Women get mental trauma after entering the house