‘महिला-बालविकास’चा लिपिक जाळ्यात
By Admin | Updated: April 13, 2015 00:03 IST2015-04-12T23:06:00+5:302015-04-13T00:03:25+5:30
‘मनोधैर्य’साठीही लाच : साताऱ्यात ‘एसीबी’ची कारवाई

‘महिला-बालविकास’चा लिपिक जाळ्यात
सातारा : अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानातील रक्कम जमा केल्याचे ठेव प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने लाच घेतल्याचे उघड झाले आहे. लाच स्वीकारताना या लिपिकास रंगेहात पकडण्यात सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रविवारी यश आले.
धनंजय सोपान भुजबळ असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव असून, दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्याला सापळा लावून पकडण्यात आले. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या बहिणीला शासनाच्या मनोधैर्य योजनेंतर्गत अनुदान मंजूर झाले होते. त्यातील दीड लाख रुपये स्टेट बँकेच्या सातारा शाखेत तीन वर्षांसाठी जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी धनंजय भुजबळ याने पंधरा हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने याविषयी ११ एप्रिलला ‘एसीबी’कडे तक्रार नोंदविली होती.
प्रमाणपत्र देण्यासाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात तडजोडीअंती दहा हजार रुपयांची मागणी भुजबळ याने केली होती. ही रक्कम शिंगणापूर (ता. माण) येथील अथर्व मंगल कार्यालयाजवळ आणून देण्यास त्याने सांगितले होते. त्यानुसार रविवारी सापळा रचण्यात आला. भुजबळ याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम शिंगणापूर ते गुप्तलिंग रस्त्यावरील अथर्व मंगल कार्यालयासमोर रस्त्याकडेला स्वीकारली. त्याचवेळी त्याला रंगेहात पकडले. भुजबळ विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)