..अन ऊसाच्या फडातच झाली महिलेची प्रसूती, ऊसतोड कामगार महिला व बाळ सुखरूप; म्हारुगडेवाडी येथील घटना

By प्रमोद सुकरे | Published: March 3, 2024 12:06 PM2024-03-03T12:06:10+5:302024-03-03T12:09:48+5:30

शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

woman delivered baby in a field | ..अन ऊसाच्या फडातच झाली महिलेची प्रसूती, ऊसतोड कामगार महिला व बाळ सुखरूप; म्हारुगडेवाडी येथील घटना

..अन ऊसाच्या फडातच झाली महिलेची प्रसूती, ऊसतोड कामगार महिला व बाळ सुखरूप; म्हारुगडेवाडी येथील घटना

प्रमोद सुकरे

कराड- परमेश्वराने बनवलेली सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे स्त्री असं म्हटलं जातं.या स्त्रीनं स्वत: आई होणं हा तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद मानला जातो. पण त्यासाठी तिला किति वेदना सहन कराव्या लागतात हे तिचे तिलाच माहित. म्हणून तर तिचा परिवार तिची खूप काळजी घेतो. पण सगळ्याच महिलांच्या नशिबी ती काळजी घेणे असतेच असे नाही. कराड तालुक्यात म्हारुगडेवाडी येथे तर शनिवारी ऊसतोडीसाठी आलेल्या एका कामगार महिलेची चक्क उसाच्या फडातच प्रसूती झाली. उंडाळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने फडात जाऊन त्या महिलेची प्रसुती सुखरूप केली खरी पण या घटनेकडे इतक्या सहजतेने पाहून चालणार नाही हे ही तितकेच खरे आहे.

शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मग डॉ. शेखर कोगनुळकर यांनी त्यांचे पथक ॲम्बुलन्स घेऊन म्हारुगडेवाडी( ता.कराड) येथे तात्काळ पाठवले.

म्हारुगडेवाडी येथे ज्या ठिकाणी ही महिला उसाच्या फडात होती त्या ठिकाणी ॲम्बुलन्स घेऊन जाणेही शक्य नव्हते. मग हे पथक स्ट्रेचर व इतर सगळे साहित्य घेऊन त्या ऊसाच्या फडात पोहोचले. मात्र सदरच्या महिलेला  जास्त त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात घेऊन न जाता डाँक्टरांशी चर्चा करुन तेथेच प्रसूती करण्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला. आणि प्रसूती पूर्ण झाल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याची खात्री करून त्यांना उंडाळे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.आता बाळ व बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. राधा प्रकाश मिरेकर(वय ३०- बुलढाणा) असे त्या आईचे नाव आहे.

या सर्व कामात वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजू शेडगे, त्यांचे सहकारी डॉ.शेखर कोगनुळकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत दाभोळे व त्यांच्या ग्रामीण रुग्णालयातील सहकारी अधिपरिचारक सचिन पवार, प्रतिक गायकवाड,सुरक्षा रक्षक सागर धुमाळ, वाहन चालक चोपडे
या सर्वांची मदत झाली. या सर्व पथकाचे कौतुक होत आहे.

यांना रजा कोण देणार?

शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी, बालसंगोपनासाठी पगारी रजा असते. अलीकडच्या काळामध्ये त्याचा कालावधीही वाढवण्यात आला आहे म्हणे; पण परिस्थितीने गांजलेल्या अशा ऊसतोड मजूर महिलांना प्रसूतीसाठी ची रजा कोण देणार? हा खरा प्रश्न आहे.

चौकटी बाहेर जाऊन काम

खरं तर चौकटीत राहून काम करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. फिल्डवर जाऊन काम करणे त्यांच्या कक्षेत येत नाही.पण परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले पथक प्रत्यक्ष उसाच्या फडात पाठवून माणूसकिचे दर्शन घडवले आहे.

संबंधित महिलेला प्रसूतीच्या वेदना होत आहेत याबाबत मला फोन आला. तात्काळ तिथे आम्ही आमचे पथक पाठवले .पण बाळाचे डोके बाहेर आल्याचे पथकातील सदस्यांच्या लक्षात आले. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेथेच प्रस्तुती करण्याचा निर्णय घेतला. सध्या बाळ व त्याची आई दोघेही सुखरूप आहेत.

 डॉ. शेखर कोगनुळकर
 उंडाळे

Web Title: woman delivered baby in a field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.