कृष्णाकाठावर बिनविरोध निवडणुकीचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:51+5:302021-01-10T04:29:51+5:30
चौरंगीनाथ डोंगर पायथ्याशी संजयनगरची लोकवस्ती आहे. या वाढत्या लोकवस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा असावा, अशी मागणी होती. या मागणीनुसार स्थानिक ...

कृष्णाकाठावर बिनविरोध निवडणुकीचे वारे
चौरंगीनाथ डोंगर पायथ्याशी संजयनगरची लोकवस्ती आहे. या वाढत्या लोकवस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा असावा, अशी मागणी होती. या मागणीनुसार स्थानिक राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकारी यांनी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रयत्नांना शासकीय पातळीवर यश येऊन गतवर्षी संजयनगर ग्रामपंचायत अस्तित्वात आली. २४ डिसेंबर २०१९ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीवर शिक्कामोर्तब झाले. ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे २ हजार २०० आहे. मतदान १ हजार ३५० आहे. स्थापना झाल्यावर पहिलीच निवडणूक लागली. या निवडणुकीत राजकीय संघर्ष होणार का? याकडे लक्ष होते. राजकीय हालचालीही सुरू होत्या; मात्र पहिलीच निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू झाली. राजकीय संघर्ष टाळून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. या निर्णयात सर्वसमावेशक सहभाग आल्याने राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला.
पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. राजकीय वाद टाळून गावाने पहिलीच निवडणूक बिनविरोध केल्याची नोंद इतिहासात होईल. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोधचे चित्र स्पष्ट झाले. या प्रक्रियेत जे सदस्य म्हणून निवड झाले त्यांचे आणि गावच्या हितासाठी ज्यांनी माघार घेतली त्यांच्याही योगदानाची चर्चा आहे. संजयनगरची बिनविरोध वाटचाल निश्चितपणे यशाकडे नेणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
फोटो : ०९केआरडी०५
कॅप्शन : संजयनगर (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.