त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:59+5:302021-03-24T04:36:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे ...

Wildlife is roaring in the flames of their anger! | त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे दिसून येत आहेत. कारवाई करणाऱ्या वनविभागाची त्रेधा उडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रकारामुळे नाहकपणे वनसंपदा आणि वन्यजीव यांची न भरून येणारी हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही.

नैसर्गिक समृध्दी आणि वनसंपदा मुबलक उपलब्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यात वनक्षेत्राचाही उत्तमपणे सांभाळ करण्यात आला आहे. परिणामी बिबट्यासह अनेक वन्यप्राणी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात मुक्तपणे वावरत असल्याचे आढळून येते. सुरक्षित अधिवास लाभल्यामुळे वन्यजीवांची संख्याही या परिसरात वाढल्याचे पहायला मिळते. ही समृध्दता टिकवून ठेवण्यासाठी आणि वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी वनविभाग कार्यरत राहतो.

हिवाळा संपून उन्हाच्या रापीमुळे वनक्षेत्रातील गवत वाळू लागले की वणवा लागण्याच्या घटना सुरू होतात. गतवर्षी लॉकडाऊन आणि कोविडमुळे जिल्ह्यात वणव्याचे प्रमाण मर्यादित होते. अंधश्रध्दा आणि पारंपरिक विचारांच्या पगड्यामुळे खासगी क्षेत्र जाळत असताना वणवा लागल्याच्या घटना मागच्यावर्षी घडल्या होत्या. वर्षभरात वनकारवाई केलेल्या गावांतच वणवा लागल्याने याविषयी चर्चा सुरू झाली.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सातारा तालुक्यातील काही गावांच्या तरूणाईने या वृत्ताला दुजोराही दिला आहे. याबाबत तक्रार केली तर गावात वाद होतील म्हणून हा विषय आम्ही कुठेच बोललो नाही. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, किंवा ज्यांचे वनक्षेत्रातील अतिक्रमण काढले गेलेय त्यांच्याकडून चिडून हा प्रकार होत असल्याची माहिती तरूणाईने दिली.

चौकट :

माणसांची जिरवायला प्राण्यांची आहुती!

वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची असते. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये शिकार, बेकायदेशीर वृक्षतोड, वन हद्दीतील बांधकाम करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर वन कायद्यांन्वये गुन्हे दाखल केले जातात. ज्या ज्या गावांमध्ये वनविभागाच्यावतीने अशी कारवाई झाली आहे, त्याच गावात वणवा लागल्याची घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. वनक्षेत्राच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागावरील राग काढण्याच्या निमित्ताने वनसंपदा आणि वन्यजीव यांच्या जिवावर उठणेे मानवतेला धरून नाही, हे नक्की.

Web Title: Wildlife is roaring in the flames of their anger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.