डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करतायत वन्यप्राणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:19+5:302021-06-26T04:26:19+5:30
पेट्री : वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती, नाचणीची शेती ...

डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करतायत वन्यप्राणी !
पेट्री : वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती, नाचणीची शेती करतात. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील सह्याद्रीनगर येथे जंगली प्राण्यांपासून भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसरातील शेतकरी या समस्येला हतबल झाले आहेत. बहुतांशी शेतकरी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घालत आहेत.
कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील भागात नाचणी व भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उन्हाळ्यात तरव्याच्या भाजण्या करून मे अखेरीस व जूनच्या प्रारंभी धूळवाफेला पेरणी केली गेली. या वर्षी तौक्ते चक्रीवादळाच्या व माॅन्सूनपूर्व पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात वाफसा चांगला झाला. अधूनमधून ऊन-पाऊस यामुळे रोपांची वाढ होण्यास पोषक वातावरण आहे. ओढ्यांना पुरेसे पाणी आले असून दहा-बारा दिवसांनंतर मोठ्या पावसात चिखल करून भातलावणीस प्रारंभ होणार आहे. परंतु रात्री भाताच्या, नाचणीच्या वावरात तरव्यांमध्ये केलेली रोपे खाण्यासाठी अनेक जंगली प्राणी येत आहेत.
सालिंदर, ससे, रानगवे, रानडुक्कर रात्री वावरात येऊन रोपे खात आहेत. तसेच रोपे तुडवून नासधूस करत आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी झडपी ठोकडा, बुजगावण्यासारखे अनेक उपाययोजना करत आहेत. काही जण रात्री रानात ओरडून जनावरांना हाकलवत आहेत. काही दिवसांनंतर भातलावणीस प्रारंभ झाल्यावर भाताच्या रोपांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे शेती लावणीअभावी पडून राहून आर्थिक झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीककर्ज घेतल्याने पीकविम्यांचे संरक्षण मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
(कोट)
भातलावणीसाठी आठ ठिकाणी तरव्यातून भाताची रोपे तयार केली. परंतु दोन दिवसांपूर्वी रानडुकरांच्या कळपाने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाताचा वाफसा खाऊन, तुडवून नासधूस केला असल्याने भात लावणीसाठी रोपांची कमतरता भासणार आहे.
-शंकर शिंदे, शेतकरी, सह्याद्रीनगर
२५पेट्री
कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील सह्याद्रीनगर (ता. जावळी) येथे वन्यप्राण्यांकडून भातशेतीचे झालेले नुकसान. संरक्षणासाठी शेतकरी वर्गाकडून कुंपण लावले जात आहे. (छाया : सागर चव्हाण)