वाईचा घाट ठरतोय अपघातांची वाट !

By Admin | Updated: May 7, 2017 14:43 IST2017-05-07T14:43:42+5:302017-05-07T14:43:42+5:30

संरक्षक कठडे ढासळले : अपघातांचे सत्र सुरूच, जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास ?

Wicha Ghat leads to the accident! | वाईचा घाट ठरतोय अपघातांची वाट !

वाईचा घाट ठरतोय अपघातांची वाट !

आॅनलाईन लोकमत

वाई (जि. सातारा), दि. ७ : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटात सध्या अपघातांची मालिका सुरु आहे. हे अपघात इतके भयंकर आहेत की, अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून गेल्या अनेक महिन्यापासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने वाहनचालकांची जीव टांगणीला लागला आहे.

वाई-पाचगणी दरम्यान असलेल्या पसरणी घाटातून सतत वाहतूक सुरू असते. महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने पर्यटकही याच घाटातून ये-जा करतात. मात्र, सध्या वाहनधारकांसह पर्यटकांना जीव धोक्यात घालूनच घाटातून प्रवास करावा लागत आहे.

या घाटातील ठिकठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची पडझड झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. ज्या ठिकाणी कठड्यांची पडझड झाली आहे त्या ठिकाणी वाळून भरलेली पोती आणि प्लास्टीकचे बॅरल संरक्षणासाठी उभे करण्यात आले आहेत. कठड्यांची पडझड झाल्याने या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह पर्यटकांन प्रामुख्यांने रात्रीच्या वेळी धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. संरक्षक कठडे दिसत नसल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घाटातील संरक्षण कठड्यांची चाळण झाली असून बांधकाम विभागाकडून अद्याप कसलीही उपाययोजना करण्यात आली नाही. वाळूनी भरलेली पोती आणि फुटके ड्रम ढासळलेल्या कठड्यांचे संरक्षण करीत असल्याचे विदारक चित्र सध्या पसरणी घाटात पहावयास मिळत आहे.

घाटात सात ते आठ ठिकाणी भलेमोठे भगदाड पडलेले असताना बांधकाम विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही हालचाली केल्याचे दिसत नाही. अपघातात किती जणांचे जीव गेल्यावर बांधकाम विभाग कठड्यांच्या कामास सुरुवात करणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच

वाईहून पाचगणी महाबळेश्वर तसेच महाड मार्गे कोकणात जाण्याचा मुख्य मार्ग पसरणी घाटच असल्याने या घाटात वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. एखादा अपघात झाल्याने घाटात वाहतुकीची कोंडी होते. सध्या पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू असल्याने वाहनांच्या घाटात चार-पाच किलोमीट अंतरावर रांगा लागत आहे.

रुंदीकरणाची गरज

पसरणी घाटातून होणारी दळवळण पाहता या घाटाचे वाहतुकीच्या दृष्टीने रुंदीकरण करणे गरजेचे आहे. काही माहिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु सध्या ते काम बंद आहे. बांधकाम विभागाने या बाबीची गांभीयार्ने दखल घेवून वाहन चालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

याच आठवड्यात अपघात

पसरणी घाटात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाला आपला प्राण गमवावा लागला. ताबा सुटल्याने एक माल टक्र दहा ते पंधरा फूट लांबीचा संरक्षक कठडा तोडून दोनशे फुट खोल दरीत कोसळला. त्यामुळे संरक्षक कठड्यांच्या कामाचा कामाचा दर्जा तपासण्याची वेळ आली आहे.

Web Title: Wicha Ghat leads to the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.