विरोधकांनी गेल्या सहा वर्षांत सभागृहात तोंड का उघडले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:19+5:302021-06-27T04:25:19+5:30

कऱ्हाड : ‘निवडणुकीच्या तोंडावर आता जे विरोधक आमच्या कारभारावर टीका करत सुटले आहेत, त्या विरोधकांनी गेल्या सहा वर्षांत संचालक ...

Why has the opposition not opened its mouth in the House in the last six years? | विरोधकांनी गेल्या सहा वर्षांत सभागृहात तोंड का उघडले नाही

विरोधकांनी गेल्या सहा वर्षांत सभागृहात तोंड का उघडले नाही

कऱ्हाड : ‘निवडणुकीच्या तोंडावर आता जे विरोधक आमच्या कारभारावर टीका करत सुटले आहेत, त्या विरोधकांनी गेल्या सहा वर्षांत संचालक मंडळात असताना साधे तोंडही का उघडले नाही?,’ असा प्रश्न उपस्थित करत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ विंग (ता. कऱ्हाड) येथे आयोजित कोळे विभागातील सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, विलास भंडारे, सयाजी यादव, श्रीरंग देसाई, आर. टी. स्वामी, पैलवान धनाजी पाटील, सचिन पाचुपते, हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘सततच्या सत्तांतरामुळे कारखान्याची पीछेहाट झाली. ज्यांना गेल्या काळात सत्ता मिळाली, त्यांनी कारखाना डबघाईला आणला. विरोधकांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. विरोधकांकडे आता प्रचाराचे मुद्दे नसल्याने त्यांच्या भाषेची पातळी खालावली आहे. अशा लोकांना मतपेटीतून उत्तर देण्याची गरज आहे. सभासद यावेळी विरोधकांच्या विकृत राजकारणाला हद्दपार करतील, याची आम्हाला खात्री आहे.’

मदनराव मोहिते म्हणाले, ‘२०१० मध्ये अपघाताने सत्तेवर आलेल्या अविनाश मोहितेंनी कारखाना चालवायला चक्क गडी ठेवला. त्याने कारखान्याचे मोठे वाटोळे झाले. या लोकांनी ७८४ लोकांना कर्जात ढकलले. या कर्ज प्रकरणातून व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच त्यांना सत्तेची हाव आहे. अशा लोकांना कारखान्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे.’

धोंडिराम जाधव म्हणाले, ‘कृष्णा कारखान्याचे वैभव लयाला नेण्याचे काम अविनाश मोहिते व त्यांच्या संचालक मंडळाने केले. अशा भ्रष्ट लोकांना बाजूला सारण्याची हीच वेळ असून, सभासदांनी सहकार पॅनेलच्या पाठीशी राहावे.’

यावेळी श्रीरंग देसाई, सचिन पाचुपते यांचीही भाषणे झाली.

चौकट

याप्रसंगी आंबवडेचे माजी सरपंच संतोष ढेरे, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्या पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम खबाले, सुभाष गरुड, वसंत पवार, हिंदुराव पवार यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला.

फोटो ओळी :

विंग, ता. कऱ्हाड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार सभेत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

Web Title: Why has the opposition not opened its mouth in the House in the last six years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.