महिला डॉक्टर प्रकरणात पीएंचा समावेश का नाही? फलटण पोलिस ठाण्यासमोर सुषमा अंधारेंचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:07 IST2025-11-04T14:06:17+5:302025-11-04T14:07:26+5:30
‘एसआयटी’ऐवजी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

महिला डॉक्टर प्रकरणात पीएंचा समावेश का नाही? फलटण पोलिस ठाण्यासमोर सुषमा अंधारेंचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क, फलटण (जि. सातारा) : येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि माजी खासदार यांचे दोन पीए यांचा या प्रकरणात कुठेही समावेश का केला नाही, असा सवाल करीत उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पोलिस ठाण्यासमोरच प्रश्नांचा भडिमार केला. ‘एसआयटी’ऐवजी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
येथील पोलिस ठाण्यासमोर अंधारे यांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना सोबत घेऊन त्या आंदोलनाला बसल्या होत्या. ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’ ही घोषणा त्यांनी दिली. यावेळी श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आरोपींना फाशीची मागणी करीत तहसील कार्यालय येथून पायी जाऊन ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांची वडवणी तालुक्यातील तिच्या गावी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.
तपासी अधिकाऱ्यांना विचारला जाब...
तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी हा तपासाचा भाग असल्याने मी माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावर उत्तरे मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असा इशारा अंधारेंनी दिला.
माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे...
- मृत महिला डॉक्टरचे वडील उपस्थित होते. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिच्यावर अन्याय करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
 - डॉक्टर युवतीचा भाऊ म्हणाला, आम्ही नावे दिली, तर त्या संशयितांना आरोपी करणार का? तिने नावे सांगितली. तरीही त्यांची चौकशी का केली नाही, त्याचा आम्ही धिक्कार करतो.