बसस्थानकाबाहेर पडताच कानावर प्रश्न, ‘येणार का?
By Admin | Updated: January 20, 2015 00:01 IST2015-01-19T22:42:30+5:302015-01-20T00:01:23+5:30
’ शिक्षण- नोकरीसाठी परगावी राहणाऱ्या भगिनींना रात्रीचा अनुभव--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची...

बसस्थानकाबाहेर पडताच कानावर प्रश्न, ‘येणार का?
सातारा : रात्रीच्या वेळी परगावाहून साताऱ्यात आलेल्या एकट्या स्त्रीला बसस्थानकाच्या बाहेर ‘येणार का ?’ हे वाक्य काहीदा तोंडाने तर काहीदा नजरेने विचारले जाते. महिलांना सर्रास येणारा हा अनुभव ‘लोकमत’च्या व्यासपीठावर सांगण्यासाठी आता महिला बोलत्या झाल्याहेत. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांना हे अनुभव नेहमीच आले. ते ‘लोकमत’ने ‘स्टींग आॅपरेशन’मधून मांडल्याने महिलाही बोलत्या झाल्या आहेत. महिला कितीही धाडसी असली तरीही पुरुषांची एक बुभुक्षित नजर तिचे मनोधैर्य कोसळवून टाकते. याविषयी घरात सांगितले तर कुटुंबीय चुकीचा अर्थ घेतील का, याची धास्ती महिलांना असते. म्हणून सहन करणे हाच पर्याय महिलांपुढे राहतो. आता मात्र महिलांनी खुलेपणाने हे अनुभव सांगितले पाहिजेत आणि कुटुंबीयांनीही ते तितक्याच मोकळेपणाने ऐकून घेऊन त्यावर तातडीने इलाज केला पाहिजे. खोट्या इब्रतीच्या आड आता महिला आणि त्यांची स्वयंप्रतिष्ठा पणाला न लावणं हीच आजची गरज असल्याचेही महिलांनी बोलून दाखविले. (प्रतिनिधी) चक्क काठीने दिला प्रसाद! काही दिवसांपूर्वी एक महिला स्टॅण्डवर रात्री साडेनऊच्या दरम्यान पतीची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात पन्नाशीतील एकाने तिला ‘राजवाड्याला सोडू का?’ असे विचारले. त्या महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पतीच्या गाडीवर बसल्यावर त्या माणसाने तिच्याकडे अश्लील हावभाव केले. पतीला सांगून त्याचा पाठलाग करत त्या महिलेने संबंधित पुरुषाला नगरपालिकेसमोर थांबायला लावले. त्याच्या अश्लील कृत्याविषयी जाब विचारून त्याला चक्क काठीने मारले. यावेळी बघ्यांचीही चांगलीच गर्दी झाली होती. जमलेल्या जमावानेही त्याला चांगलाच चोप दिला. नंतर पूर्ण रात्र त्याने पोलीस ठाण्यात काढली.