काकडीच्या मुळाला गव्हाच्या काडाचे आच्छादन
By Admin | Updated: March 20, 2016 23:23 IST2016-03-20T21:21:33+5:302016-03-20T23:23:40+5:30
कोपर्डे हवेलीतील शेतकऱ्याचा प्रयोग : उष्णता कमी करणाऱ्या महागड्या ‘मल्चिंग पेपर’ला फाटा; उत्पादन खर्चात बचत

काकडीच्या मुळाला गव्हाच्या काडाचे आच्छादन
उन्हाळी हंगाममध्ये पिकांचे उत्पादन घेणे अडचणीचे असते. तापमानात सतत वाढ होत असल्यामुळे पिकांचे उत्पादन कमी निघते. काही वेळेस संपूर्ण पीकच वाया जाते. उत्पादन कमी निघत असल्यानेच उन्हाळी हंगामात माळव्याच्या पिकाला दर मिळतो. त्यासाठी कोपर्डे हवेलीतील शेतकरी महादेव चव्हाण यांनी काकडीला तापमानाचा सामना करण्यासाठी मल्चिंग पेपरऐवजी गव्हाच्या काडाचा वापर केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होणार आहे
काकडी पिकाचे उत्पादन उन्हाळी हंगामात घेणे अवघड असते. वाढत्या तापमानामुळे उत्पादन घटते. कोपर्डे हवेलीतील महादेव चव्हाण यांनी एक एकर क्षेत्रामध्ये काकडीचे पीक घेताना तापमानाचा सामना करण्यासाठी गव्हाचे काड रोपांच्यामध्ये टाकले आहे. एक एकरात काकडीच्या ७ हजार ७०० रोपांची लागण केली आहे. एका रोपाची किंमत १ रुपये ६० पैसे असून, त्यांना रोपासाठी बारा हजार खर्च आला आहे. दोन सरीतील अंतर पाच फूट आहे.
रोपातील अंतर दीड फूट आहे. रोपांच्या लागणीपासून ४५ दिवसांत उत्पादन सुरू होते. ठिबक सिंचनचा वापर करण्यात आल्याने पाणी योग्य पद्धतीने देता येते. रोपांचे वेल तारेवर चढविण्यासाठी खांब रोवले आहेत. सध्या बाजारपेठेत काकडीचा दहा किलोचा दर २५० रुपये आहे. ऐन उन्हाळ्यात एप्र्रिल, मे, जूनमध्ये काकडीचा दर उच्चांकी असतो. काकडीचे पीक वजनी असल्याने उत्पादन चांगले आल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. उन्हाळ्याच्या कालावधीत शेतकऱ्यांचा माळव्याचा आधार असतो. माळव्याचे पीक चांगले आले तरच त्यांना पुढील पिकासाठी व घरखर्चासाठी पैशाचे तजवीज करता येते. सात-आठ लाखांपर्यंत काकडी पिकाचे उत्पादन निघेल, असा अंदाज महादेव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
तापमान कमी, तणाचाही नायनाट
उन्हाळ्यात पिकाच्या मुळावर होणारा उष्णतेचा मारा कमी करण्याचे काम मल्चिंग पेपर करतो. गव्हाचे काडही तेच काम करते. काकडीच्या मुळाशी होणारा उन्हाचा तडाखा काड शोषून घेतात. तसेच पहाटे पडणारे दवही साठवून ठेवण्याचे काम काड करते. त्यामुळे दिवसात शेतातील तापमान कमी होते. काडाचे आच्छादन असल्याने तण येत नाही. पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. परिणामी, उत्पादन वाढीस मदत होते.