हद्दपारीचा उपयोग काय, कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:43 IST2021-09-12T04:43:56+5:302021-09-12T04:43:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सुधारण्याची संधी देऊनही अंगात मुळचीच गुन्हेगारी मुरलेल्या व निर्ढावलेल्या आरोपींना दरवर्षी शहर व जिल्ह्यातून ...

हद्दपारीचा उपयोग काय, कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सुधारण्याची संधी देऊनही अंगात मुळचीच गुन्हेगारी मुरलेल्या व निर्ढावलेल्या आरोपींना दरवर्षी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे आरोपी जिल्ह्यातच दिसत असतात, मग या कारवाईचा उपयोग काय, असाही प्रश्न निर्माण होतो.
समाजात शांतता अबाधित राहावी, यासाठी दरवर्षी पोलीस गुन्हेगारांची यादी तयार करतात. त्यामध्ये दोनपेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्या नावावर आहेत, असे लोक या हद्दपारीच्या प्रस्तावामध्ये मोडतात. अशा आरोपींना सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत हद्दपार केले जाते. मात्र बहुतांशवेळा हे लोक पोलिसांची नजर चुकवून आपल्या घरी येत असतात. तडीपार केलेले गुंड जरी शेजारी-पाजाऱ्यांना दिसले तरी, शेजारी पोलिसांना कळविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे, चुकून पोलिसांकडून आपलं नाव समजलं तर विनाकारण वाद ओढावून घेण्यासारखा आहे. त्यामुळे अशा हद्दपार झालेल्या आरोपींची माहिती देत नाहीत. परंतु पोलिसांचे खबरे हे न चुकता पोलिसांना माहिती देत असतातच. तरीसुद्धा हद्दपार झालेले आरोपी आपल्या हद्दीत बिनधास्त फिरत असतात.
चाैकट : हद्दपारीनंतर जिल्ह्यात फिरणाऱ्या ११ जणांना बेड्या
हद्दपार असतानाही जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वर्षभरात ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काही लोकांवर वर्षातून चार गुन्हे दाखल आहेत. म्हणजे कितीही गुन्हे दाखल झाले, तरी त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर माजगावकर माळ परिसरात राहणारा गुंड दत्ता घाडगे याचे. त्याला अनेकदा हद्दपार करूनही तो त्याच्या घराजवळच फिरत असतो. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तेवढ्यापुरता तो गायब होतो. पण नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणी येतो. शेवटी त्याच्यावर कारवाई करून पोलीसच हतबल होत आहेत.
चाैकट : हद्दपारी कशासाठी...
समाजाला ज्यांच्यापासून धोका आहे, कायदा व सुव्यवस्था राखताना सातत्याने व्यत्यय येत असतात, अशावेळी गुन्हेगारांच्या हद्दपारीशिवाय पर्याय नसतो. समाजाला सुरक्षित वातावरणात वावरता यावे, यासाठी अशा उपद्रवी लोकांना दरवर्षी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले जाते.
कोट : सार्वजनिक उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून दरवर्षी यादीवरील आरोपींना हद्दपार केले जाते. गुन्ह्यांच्या तीव्रतेवर त्यांचे हद्दपारीचे दिवस ठरलेले असतात. गणेशोत्सवामध्ये सरसकट सर्वांनाच दहा दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे
चाैकट : हद्दपारीच्या कारवाया
वर्षे
२०१८- ४७६
२०१९- ३९७
२०२०-३४५
२०२१-३७७