घोषणेचे काय झाले; अनेक बांधकाम मजूर मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST2021-05-12T04:39:45+5:302021-05-12T04:39:45+5:30
सातारा : जिल्ह्यामधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र ...

घोषणेचे काय झाले; अनेक बांधकाम मजूर मदतीच्या प्रतीक्षेत
सातारा : जिल्ह्यामधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक बांधकाम मजुरांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा केलेले नाहीत.
सातारा जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार मंडळ महाराष्ट्र राज्यअंतर्गत नोव्हेंबर २०११ पासून नोंदणीस सुरुवात झाली, तेव्हापासून आजतागायत एकूण ३४४४९ बांधकाम कामगारांनी या कार्यालयात नोंदणी केली आहे.
सद्यस्थितीत यापैकी जीवित नोंदणी संख्या २४०५० असून उपरोक्त शासन निर्णयानुसार जीवित नोंदणी असणाऱ्या कामगारांनाच रुपये १५०० अर्थसाहाय्य मंडळामार्फत मिळणार आहे.
शासन निर्णयाबाबत प्राप्त पत्राची अंमलबजावणी करणेकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई येथून दिनांक ५ मे २०२१ अखेर नोंदणी जीवित असलेल्या १९,८६२ कामगारांना परस्पर प्रत्येकी रक्कम रुपये १५०० असे एकूण रक्कम रुपये २ कोटी ९७ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. उर्वरित कामगारांच्या डेटामध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यांची पूर्तता करून पुढील वाटप करण्याबाबतची कार्यवाही मंडळस्तरावरून करण्यात येत आहे.
कोट
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मदत मिळेपर्यंत ज्या कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंद केलेली आहे, त्यांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित लोकांच्या त्रुटी दुरुस्त करून त्यांना ही मदत केली जाणार आहे.
- रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी
कोट
शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची मदत केली होती. बांधकाम कामगारांची केलेली नोंदणी पुन्हा तपासली जावी. कारण आम्ही बांधकाम कामगार असून आमची नोंद केलेली नाही.
- विश्वास माळी
कोट
मला शासनाकडून साहित्य खरेदीसाठी पैसे मिळाले होते. मात्र अजून हजार रुपयांची मदत केली आहे, ती मिळाली नाही. आता काम बंद असल्यामुळे हाताला काम नाही. ही मदत मिळाली तर चांगले होईल.
- पांडुरंग जमदाडे
कोट
शासनाने केलेली मदत खात्यावर जमा झालेली आहे. अजून किती दिवस काम बंद राहणार आहे याचा पत्ता नाही. त्यामुळे शासनाने काम बंदच्या काळामध्ये अशी मदत केली, तरच आम्ही आमची उपजीविका चालवू शकतो.
- सचिन पवार
नोंदणी असलेले बांधकाम कामगार २५०५०
नोंदणी नसलेले कामगार १४०००